मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभरात सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. अशातच जरांगेंनी केलेल्या बेमुदत उपोषणानंतर शिंदे-फडणवीस सरकारने चर्चा करत ४० दिवसात आरक्षणावर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. आता ही मुदत संपत आली आहे. अशातच जरांगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर बोलताना आता मनोज जरांगेंनी मोदी-शाह-शिंदेंचा उल्लेख करत थेट इशारा दिला. ते बुधवारी (१८ ऑक्टोबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे म्हणाले, “महाराष्ट्र देशातील क्रमांक दोनचं राज्य आहे. त्यामुळे यात लक्ष घालायचं की नाही हे त्यांनीच ठरवायचं आहे. शेवटी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही लढणारच आहे.”

“मोदी-शाह-शिंदेंना वेळ नसेल, तर…”

“जर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गोरगरिबांना न्याय देण्यासाठी वेळ नसेल, तर तो प्रश्न त्यांचा आहे. जनता म्हणून विनंती करणं आमचं काम होतं. आम्ही लढणारच आहोत आणि आरक्षण मिळवणारच आहोत यात काही दुमत नाही,” असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

“…तर मग तो वेळच कशासाठी घेतला”

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “आता २२ ऑक्टोबरला सभा होणार नाही. आम्हाला आता आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो की, सरकार आरक्षण देणार आहे. कारण सरकारने त्यासाठी वेळच घेतला आहे. जर आरक्षण देणार नव्हते, तर मग तो वेळच कशासाठी घेतला.”

हेही वाचा : “छगन भुजबळ यांची वक्तव्ये महाराष्ट्रातील समाजात आग लावणारी, हा विषय…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

“आम्ही सरकारला दिवाळीप्रमाणे १० दिवस बोनस दिले”

“मराठा समाज उद्या त्यांना प्रश्न विचारेल की, आरक्षण द्यायचं नव्हतं तर मग वेळ कशासाठी घेतला. सरकारने ३० दिवसांचा वेळ मागितला होता, आम्ही ४० दिवस दिले. आम्ही दिवाळीप्रमाणे १० दिवस बोनस दिले आहेत. त्यांना आणखी काय पाहिजे,” असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange on maratha reservation mention modi shah shinde pbs
Show comments