मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके तसेच व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची वैद्यकीय चाचणी करण्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) मागणी विशेष न्यायालयाने गुरुवारी मान्य केली. त्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल १० दिवसांत सादर करण्याचे आदेश पुणे येथील ससून रुग्णालयाला दिले.
शर्मा हे प्रदीर्घ काळ रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्याची मागणी केली होती. शर्मा यांना १७ जून २०२१ रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते पुण्यातील सरकारी रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे त्यांची नेमकी वैद्यकीय स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्याची मागणी ‘एनआयए’ने विशेष न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली होती. शर्मा यांना कोणताही आजार नसून तंदुरुस्त आहेत. केवळ कारागृहातील वास्तव्य टाळण्यासाठी ते सरकारी रुग्णालयाचा वापर करत असल्याचा दावा ‘एनआयए’ने केला आहे.