मुंबई : व्यावसायिक मनसुख हिरेन खून प्रकरणातील आरोपी मनीष सोनी याने विशेष न्यायालयाला पत्र लिहून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेला कबुलीजबाब मागे घ्यायचा असल्याचे कळवले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्यांतर्गत (एनआयए) स्थापन केलेल्या विशेष न्यायालयानेही सोनी याच्या पत्राची दखल घेऊन तपास यंत्रणेला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. ही गाडी हिरेन याच्या मालकीची होती हे उघड झाले होते. त्यानंतर हिरेन याचा खून झाला होता. त्याचा खून करून इतर आरोपींच्या मदतीने त्याचा मृतदेह फेकल्याचा आरोप एमआयएने सोनी आणि सतीश मोथकुरी यांच्यावर ठेवला आहे. हा खून एका मोठ्या कटाचा भाग होता आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन याचा खून केला गेला, असा तपास यंत्रणेचा दावा आहे.

हेही वाचा – प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अभ्यासक्रमांना फटका

हेही वाचा – मुंबईत येणाऱ्या विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

सोनी याचा १७ जून २०२१ रोजी दंडाधिकाऱ्यांसमोर कबुलीजबाब नोंदवण्यात आला होता. त्यावेळी, त्याने हिरेन याच्या खुनापर्यंतचा घटनाक्रम सांगितला होता. सोनी हा सध्या पुणे येथील येरवडा तुरुंगात बंदिस्त आहे. त्याने, २५ सप्टेंबर रोजी विशेष एनआयए न्यायालयाला पत्र लिहिले होते. त्यात त्याने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेला कबुलीजबाब मागे घ्यायचा असल्याचे म्हटले होते. विशेष न्यायालयाला त्याचे हे पत्र बुधवारी प्राप्त झाले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने एनआयएला त्यावर २५ ऑक्टोबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात वाझे, शर्मा आणि इतर काही माजी पोलिसांसह एकूण दहा आरोपी आहेत.