मंत्रालयाचा तिसरा मजला. दुपारची बारा-साडेबाराची वेळ. एका महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यावरील बंद असलेल्या पंख्याने अचानक पेट घेतला. आग, आग, असा गोंधळ सुरू झाला. सर्व कर्मचारी दरवाजाकडे धावले. एकाने अग्निशमन उपकरण आणून ते आगीच्या दिशेने रिकामे केले. मात्र त्यामुळे सर्वत्र धूर पसरला. परिणामी एकच धांदल उडाली. आग लागली पळा पळा, असा गलका सुरू झाला आणि पुन्हा एकदा मंत्रालयाच्या त्या भीषण आगीच्या आठवणींने कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली.
अग्निशमन अधिकारी-कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, विद्युत अभियंते-कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंख्याची आग विझविली. पंखा काढून टाकला. परंतु कार्यालयातील इतर पंखे व लोंबकळणाऱ्या वायरी बघून कर्मचाऱ्यांच्या मनातील भितीचे सावट मात्र त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला २१ जून २०१२ ला आग लागून त्यात चौथा, पाचवा व सहावा मजला जळून खाक झाला. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या घटनेचा धसकाच घेतला आहे. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीचा कसा सामना करायचा, यासाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दोन वेळा प्रशिक्षण दिले. रंगीत तालीमीही घेतल्या गेल्या. मात्र मंगळवारच्या या तशा किरकोळ वाटणाऱ्या परंतु गंभीर घटनेने सारे मुसळ केरात, याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला.
सध्या मंत्रालयाच्या दुरुस्तीचे व नूतनीकरणाचे काम सुरू आहे. विस्तारित इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर विधी व न्याय विभागाचे ३५० क्रमांकाचे मोठे दालन आहे. दुपारी बारा-साडे बाराच्या दरम्यान एका महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यावर बंद असलेल्या पंख्याला आग लागली. जाळ दिसू लागल्याचे दुसऱ्या कर्मचाऱ्याने पाहिले आणि आग आग अशी ओरड करताच सर्व कर्मचारी दरवाजाकडे धावले. तेवढय़ात एका कर्मचाऱ्याने अग्निशमन उपकरण आणले ते फोडले. त्याचा सर्वत्र धूर पसरला. परिणामी आग पसरल्याच्या भीतीने कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. त्या मजल्यावरील इतर कार्यालयांमध्येही धूर घुसल्याने एकच घबराट उडाली आणि कर्मचारी कार्यालयाबाहेर धावले.
काही वेळाने अग्शिमन अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी-कर्मचारी आले, त्यांनी आग विझविली आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले.
आम्हाला फक्त पळायलाच शिकविले
पंख्याला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन उपकरणातील पाण्याचा फवारा मारला. परंतु त्यामुळे धूर पसरल्याने एकच घबराट उडाली. आग कशी विझवायची हे त्या कर्मचाऱ्याला माहिती नव्हते. मात्र आपत्कालीन परिस्थिती फक्त पळायला शिकविले, उपकरणे कशी हाताळावीत वा त्याचा कसा वापर करावा, याबद्दल काहीच प्रशिक्षण दिले नाही, अशी प्रतिक्रिया त्या कर्मचाऱ्याने व्यक्त केली.