तब्बल सव्वादोनशे कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या मंत्रालयाच्या नूतनीकरणाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त होत असतानाच पुन्हा सुमारे तीनशे कोटी रुपये खर्चून विस्तारीत इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव एका विदर्भीय ठेकेदाराने पुढे सरकवला आहे. मंत्रालयाच्या दुरूस्तीबाबत सरकारने नेमलेल्या आर्किटेक्ट राजा अडेरी यांनी याबाबतचे सादरीकरणही सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडे नुकतेच केले असून त्याबाबत आता मंत्र्यांच्या भूमिकेकडे याकडे विभागाचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सन २०१२ मध्ये लागलेल्या भीषण आगीत मंत्रालयाच्या मुख्य इमारतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या दुर्घटनेत तिघांचा बळी गेला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर जळीत इमारतीची तातडीने दुरूस्ती आणि नूतनीकरण करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. त्यानुसार राजा अडेरी यांची आर्किटेक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर दुरुस्तीची जबाबदारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सोपविण्यात आली. सुमारे सव्वा दोनशे कोटी रुपये खर्चून युनिटी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून या इमारतीची दुरूस्ती करण्यात आली. मात्र दुरूस्तीचे काम प्रदीर्घ काळ लांबले. शिवाय पावसाळ्यात होणारी गळती, मुख्यमंत्री कार्यालयातील छत कोसळण्याची घटना यामुळे या कामाच्या दर्जाबाबतची शंका उपस्थित करण्यात आल्या.

मुख्य इमारतीच्या दुरूस्तीबाबत आलेल्या वाईट अनुभवानंतर विस्तारित इमारतीच्या नूतनीकरणाबाबत नव्या सरकारने फारसे स्वारस्य दाखवलेले नसतांनाच आता काही ठेकेदारांनीच यासासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा मंत्रालयात ऐकावयास मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्किटक राजा अडेरी यांनी विस्तारित इमारतीच्या नूतणीकरणाबरोबरच मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांसाठी प्रेवशद्वाराजवळ मोठा डोम उभारणे, वाहनांसाठी तळ बांधण्याबाबचा एक प्रस्ताव नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागास दिला आहे. एवढेच नव्हे तर त्याबाबतचे सादरीकरणही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर करण्यात आले आहे. त्यात विस्तारीत इमारतीच्या नुतनीकरणासाठी २२५ कोटी तर वाहनतळ व अन्य कांमासाठी ८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव विभागाने नव्हे तर आर्किटेकने दिला असून त्यामागे विदर्भातील एक मोठा ठेकेदार असल्याची चर्चाही मंत्रालयात ऐकावयास मिळत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mantralaya expansion