आगीनंतर कोटय़ावधी रुपये खर्चून नुतनीकरण करण्यात आलेल्या मंत्रालयातील कामाच्या दर्जाबाबत आता कर्मचाऱ्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कुचकामी वातानुकूलित यंत्रणेमुळे कर्मचाऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत असून श्वासोच्छवासालाही त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारावर असेल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला असून या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी मुख्य सचिवांकडे केली आहे.
२१जून २०१२ रोजी मंत्रालयास लागलेल्या आगीत चार मजले जळून खाक झाले होते. त्यानंतर मंत्रालयाच्या नुतनीकरणाचे काम ‘युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट्स’ या कंपनीला देण्यात आले. प्रारंभी १३८ कोटी रुपयांचे काम आता अडीचशे कोटींच्या पुढे गेले असून दोन वर्षे होऊनही ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाच आता वातानुकूलित व्यवस्थेत बसूनही घामाच्या धारांनी कर्मचारी, अभ्यागत हैराण झाले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘युनिटी’ कपंनीच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे हैराण झालेल्या कर्मचाऱ्यांनी अखेरचा पर्याय म्हणून थेट मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांना साकडे घातले आहे.
मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर नगरविकास विभाग आहे. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर १८ मार्चपासून येथे विभाग स्थलांतरीत झाला. या मजल्यावरील वातानुकूलित यंत्रणा अनेकदा बंद वा कुचकामी ठरत असल्याने प्रचंड उकाडय़ाने कर्मचारी हैराण झाले आहेत. श्वास घ्यायलाही त्रास होत आहे.
गेल्या आठवडय़ात या नगरविकास विभागाच्या सचिवांनाही दिवसभर घामाच्या धारा पुसतच कामकाज करावे लागले. परंतु महिनाभर वारंवार तक्रारी करूनही ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.