मंत्रालयातील दुरुस्तीकामामुळे दुरवस्था, घाण, चिखल या परिस्थितीचा सामना अधिकारी, कर्मचारी व जनतेला करावा लागत असताना निम्म्या इमारतीला मंगळवारी पाणीटंचाईलाही सामोरे जावे लागले. दुरुस्तीकाम करताना पाण्याची पाइपलाइन फुटल्याने मंत्रालयाचे उपाहारगृह दुपारनंतर बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही, स्वच्छतागृहातही पाणी नाही, खायला तर सोडाच, पण चहादेखील नाही, असे चित्र मंत्रालयात दुपारनंतर होते.
नियोजनशून्य पद्धतीने सर्व ठिकाणी अर्धवट पद्धतीने सुरू असलेल्या दुरुस्तीकामांमुळे मुख्य इमारतीची मागील बाजू आणि अ‍ॅनेक्स इमारतीचे प्रवेशद्वार परिसरात कचरा व बांधकाम साहित्याचे ढिगारे आहेत. बांबू, लोखंडी सामान व इतर साहित्यांमधून वाट काढत चालावे, तर जोडीला पावसामुळे झालेला चिखलही आहे. अस्ताव्यस्त पद्धतीने सुरू असलेल्या कामात मुख्य इमारतीच्या उपाहारगृह दिशेला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली. त्यामुळे दुपारी एक वाजल्यापासून उपाहारगृहात पाण्याचा एक थेंबही नव्हता. सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देऊनही लवकर उपाययोजना झाल्या नाहीत.
पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सायंकाळी पूर्ण झाले. वास्तविक इमारतीच्या गच्चीवर काही टाक्यांमध्ये पाणी होते. ते अन्य टाक्यांमध्ये फिरविण्याची कोणतीच यंत्रणा नाही. परिणामी उपाहारगृह बंद करावे लागले आणि मुख्य इमारतीसह काही भागांत पाणीच मिळाले नाही.