विसरभोळ्या सरकारमुळे एका पोटमाळ्याचे काम बाकी
आगीत नुकसान झालेल्या मंत्रालयास कोटय़वधी रुपये खर्चून नवी झळाळी देण्याचा सरकारच्या दाव्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. तब्बल २१५ कोटी रुपये खर्चूनही या इमारतीचे काम अपूर्णच असताना, काम पूर्ण झाल्याचा दावा करीत ठेकेदाराने आपला गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अपूर्ण कामाची यादी तयार करून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर पाठविण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे.
मार्च २०१३ मध्ये मंत्रालयाचे वरचे चार मजले आगीत खाक झाले होते. त्यानंतर मंत्रालयाची नव्याने बांधणी करण्याची सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांचा सल्ला धुडकावून लावत मंत्रालयाच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला. त्यानुसार दुरुस्तीची जबाबदारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीवर सोपविण्यात आली. अवघ्या आठ महिन्यांत मंत्रालयाला नवी झळाळी प्राप्त होईल असे सांगण्यात आले. परंतु तब्बल २१५.५५ कोटी रुपये खर्च करून आणि पावणेतीन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही मंत्रालयाच्या दुरुस्तीचे काम अपूर्ण असतानाच ठेकेदार मात्र काम संपल्याचा दावा करून निघून गेला आहे. प्रत्यक्षात मात्र मंत्रालयाचे उपाहारगृह आणि कर्मचारी संघटनांची कार्यालये असलेल्या पोटमाळ्याचे (मेझनाइन) काम अर्धवट आहे.
अशाच प्रकारे प्रत्येक मजल्यावरही कमीअधिक प्रमाणात कामाच्या त्रुटी असून त्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. मुख्य इमारतीच्या दर्शनी बाजूचा गिलावाही करण्यात आलेला नसून केवळ चुन्याचा मुलामा फासण्यात आला आहे. वीज यंत्रणेची कामेही अध्र्यावरच सोडून देण्यात आली आहेत. त्यामुळे पहिले काही मजले आलिशान वाटत असले तरी उपाहारगृहात मात्र दुर्दशा आणि दरुगधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे मंत्रालयात येणाऱ्या लोकांकडूनच सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहेत. विशेष म्हणजे ठेकेदाराशी केलेल्या करारात पोटमाळ्याचा उल्लेखच करण्यास तत्कालीन अधिकारी विसरल्याने हे काम रखडल्याचे सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा