परवानगीसाठी आतापर्यंत केवळ अडीचशे अर्ज

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करण्याच्या सूचना दिल्या जात असताना मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी गेल्या अकरा दिवसांत पालिके कडे परवानगीकरिता के वळ अडीचशे मंडळांचे अर्ज आले आहेत. दरवर्षी ही संख्या साधारणपणे अडीच ते पावणे तीन हजार इतकी असते.

गणेशोत्सवाला अवघा एक महिना उरलेला आहे. मुंबईत साधारणत: ११ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी जी मंडळे रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात अशा मंडळांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशी साधारण तीन हजार मंडळे दरवर्षी पालिकेकडे परवानग्यांसाठी खेटे घालत असतात. दरवर्षी ही संख्या वाढत असते. यंदा मात्र करोनाचे विघ्न आल्यामुळे गर्दी टाळण्यासठी  गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधने आली आहेत. मोठमोठय़ा मंडळांनी यंदा गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही मंडळे राज्य सरकारच्या नियमावलीनुसार चार फुटापर्यंतची मूर्ती आणणार आहेत. पालिकेने यावर्षी गणपती मंडळांना गेल्यावर्षीच्या परवानगीच्या आधारेच मोफत परवानगीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याकरीता सर्व मंडळांना लेखी हमीपत्र द्यावे लागणार आहे. करोनाचा संसर्ग किंवा फैलाव होऊ नये या दृष्टीने या हमीपत्रात पालिकेने अनेक अटी घातल्या आहेत. मात्र आतापर्यंत केवळ अडीचशे मंडळांचे अर्ज आले आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

गणपती मंडळांच्या तयारीबाबत आढावा घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी बोलावली होती. गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची नोंद घेऊन यावर्षीच्या गणेशोत्सव आयोजनाबाबत  मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला यावेळी दिले. त्याचप्रमाणे सीएसआर फंडमधून विविध गणेश मंडळांना ज्या काही जाहिराती मिळतील त्या जाहिराती प्रकाशित करण्याची परवानगी देण्याबाबत महापालिकेने दिशादर्शक नियमावली बनविण्याची सूचना महापौरांनी केली.

घरगुती गणपतींसाठीही नियमावली

सार्वजनिक मंडळांनंतर आता पालिकेने घरगुती गणपती आणणाऱ्यांसाठीही नियमावली तयार केली आहे. जाहीर विसर्जन करू नये, शक्यतो घरच्या घरीच विसर्जन करावे, गर्दी टाळावी, विसर्जनाला होणारी गर्दी टाळावी, आरती घरच्या घरी करावी, अशा स्वरुपाची ही नियमावली मुंबईकरांसाठी पालिकेने तयार केली असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.