दहीहंडी उत्सवाच्या आयोजनासंबंधी न्यायालयाचे निर्देश येताच ठाणे-डोंबिवलीतील मोठय़ा मंडळांनी या उत्सवातील झगमगाटाला आवर घालण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाडांनी मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचे जाहीर केले.
न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच सकाळी वर्तकनगर येथील ‘संस्कृती प्रतिष्ठान’ने यंदाच्या वर्षी उंच थरांची हंडी बांधणार नाही, असे जाहीर करीत निर्णयाची हंडी फोडण्यात आघाडी घेतली होती. त्यानंतर न्यायालयाचा निर्णय येताच माजी खासदार आनंद परांजपे यांच्यामार्फत डोंबिवलीत साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव रद्द करीत असल्याचे जाहीर करण्यात आले. ठाण्यातील शिवसेना नेते मात्र मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधी निर्णय जाहीर करणार आहेत.  
दहीहंडी उत्सवात बालगोिवदांच्या सहभागाविषयी राज्य सरकार जोवर ठोस निर्णय घेत नाही, तोवर उंच थरांची हंडी बांधली जाणार नाही, अशी घोषणा सोमवारी सकाळी ‘संस्कृती’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. गेल्या काही दिवसांत दहीहंडी फोडण्याचा सराव करताना गोंविदांना मृत्यू ओढवला होता. त्यामुळे यासंबंधी सरकारने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असून वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय होत नसल्याबद्दल सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. उत्सव साजरा करणार, मात्र उंच थरांची हंडी बांधणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, उच्च न्यायालयाचा निर्णय आपणास मान्य नसून यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा उत्सव भारतीय संस्कृती, परंपरेचा भाग आहे. त्यामुळे त्यातील झगमगाट कायम राहिलाच पाहिजे, असेही ते म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मात्र दिवसभर मौन पाळले. यासंबंधी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती आमदार एकनाथ शिंदे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा