मुंबई: रुग्णालयात पोहोचता आले नाही म्हणून मृत्यू, रुग्णालयाची शोधाशोध … ही कोणत्याही अडगावातील नाही, तर मुंबईतील स्थिती आहे. वरळी व आसपासच्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय महत्त्वाचे समजले जाते. मात्र या रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीत येणाऱ्या रुग्णांना अद्ययावत सुविधा दूरच अतिदक्षता विभागातील प्राथमिक उपचारही मिळत नाहीत. गंभीर स्थितीत येणाऱ्या रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत असल्याचे समोर आले आहे.
पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची स्थापना ही नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशान १९३७ मध्ये आनंदीलाल पोद्दार यांनी केली. मात्र हीरक महोत्सवाकडे वाटचाल सुरू असलेल्या या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा दूरच पण उपलब्ध यंत्रणाही सुस्थितीत कार्यरत नाहीत. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात किंवा अपघातामुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना प्राथमिक उपचारही मिळत नाहीत. अनेक रुग्णांना केईएम, नायर व जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात येते. गंभीर स्थितीतील रुग्णांना केईएम, नायर किंवा जे.जे. रुग्णालयामध्ये नेताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच अनेकांनी प्राण गमावले आहेत.
हेही वाचा… पुढील दोन दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता; थंडीची प्रतिक्षा कायम
पोद्दार रुग्णालयातील अपघात विभाग व आकस्मिक उपचार विभागात यापूर्वी पूर्ण क्षमतेने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या. त्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया व गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार होत होते. मात्र मागील १० वर्षांपासून या सुविधा हळूहळू बंद झाल्या आहेत. त्यामुळे वरळीतील बीडीडी चाळी, झोपडपट्ट्या, कामगार वसाहत, लहान मोठ्या चाळींमधील लाखो रहिवाशांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.
राज्य सरकारचे दुर्लक्ष
पोदार रुग्णालयात अत्यावश्यक व गंभीर स्थितीतील रुग्णांवर प्राथमिक उपचार व्हावेत यासाठी अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शांती वैभव बुद्ध विहार, नवतरुण क्रीडा मंडळ व माता रमाई प्रेरणा महिला मंडळाच्या माध्यमातून साडेचार वर्षांपासून लोकप्रतिनिधींना निवेदन देणे, जनजागृती मोर्चा, निदर्शने, सह्यांची माेहीम, मूक पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. काेणतीही कार्यवाही झाली नसल्याची माहिती रजनिश कांबळे यांनी दिली.
आकडेवारी काय सांगते …
२०१९ ते २०२३ या कालावधीत पोद्दार रुग्णालयात नेण्यात आलेल्या ५९७ अत्यवस्थ रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठविण्यात आले. वरळी पोलिस ठाण्यातील आकस्मात मृत्यू नोंदवहीतील नोंदीनुसार मागील चार वर्षांत रुग्णालयात नेण्यापूर्वी किंवा दाखल केल्यानंतर अल्पावधीत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३०० आहे. तसेच अनेकांनी शवविच्छेदन टाळण्यासाठी खासगी डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन अंत्यसंस्कार केल्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णांना योग्यवेळी उपचार न मिळाल्याने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण हे ३०० पेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रुग्णालयाचे म्हणणे काय …
आमच्याकडे अपघात विभाग आहे. परंतु पोद्दार रुग्णालय हे आयुष रुग्णालय असल्याने अतिदक्षता विभाग नाही. स्थानिकांच्या मागणीस्तव आम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांकडे अतिदक्षता विभाग सुरू करण्याबरोबरच आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी बैठक बोलवून समिती स्थापन केली आहे. – वैदय संपदा संत, अधिष्ठाता, पोदार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय