लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : टास्क देण्याच्या नावाखाली देशभरात अनेकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला राजस्थान येथून अटक करण्यात वाकोला पोलिसांना यश आले आहे. मुंबई, पुणे आणि छत्तीसगढ येथे पाचहून अधिक सायबर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग असून गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम कोट्यावधींच्या घरात आहे. आरोपींनी देशभरात अनेकांची सायबर फसवणूक केल्याचा संशय आहे. त्याबाबत वाकोला पोलीस अधिक तपास करत आहेत.
राजकरणसिंह तंवर, करणसिंह रामनरेशसिंह, मोहम्मद शाकीब असफाक अन्सारी, मिराज अन्सारी मोहम्मद आक्रम आणि फुजेल अहमद जमिल अहमद अन्सारी अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यातील राजकरणसिंह तंवर, करणसिंह रामनरेशसिंह दोघे राजस्थान येथील रहिवासी आहेत. तर शाकीब, मिराज व फिजेल ठाण्यातील भिवंडी येथील रहिवासी आहेत. २६ वर्षीय तक्रारदार व्यवसायाने अभियंता आहे. तो कुटुंबियांसह सांताक्रुज परिसरात राहतो. तसेच एका खाजगी कंपनीत काम करतो. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आरोपींनी टास्क देण्याच्या नावाखाली त्याची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने याप्रकरणी वाकोला पोलिसांकडे तक्रार केली.
त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तक्रारदाराची रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली होती. त्याद्वारे तपास केला. त्यावेळी आरोपी हे ठाण्यातील भिवंडी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या चौकशीत मुख्य आरोपी राजस्थानमध्ये राहत असून तेथून फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. अटकेनंतर त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
आरोपींच्या अटकेमुळे देशभरातील इतर सायबर गुन्ह्यांची उकल होण्याचीही शक्यता आहे. आरोपींच्या बँक खात्यात जमा झालेल्या फसवणूकीची रकमेचा तपास केला असता पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात दाखल सात कोटी २७ लाख रुपये, पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यातील ४० लाख ८५ हजार रुपयांची, उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यातील १३ लाख ८४ हजार रुपयांची, पिंपरी चिंचवड येथील २२ लाख ८५ हजार आणि छत्तीसगडमधील ४८ लाख रुपये जमा झाले होते. त्यामुळे या गुन्ह्यांमध्येही आरोपींचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. आरोपींचा देशभरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दाखल गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. ती रक्कम २५ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.