मुंबईत नव्याने येणारा कोणताही माणूस या शहराच्या गोंधळात हरवून जातो, असे म्हणतात. मात्र, वर्षांनुवर्षे या शहरात राहणाऱ्यालाही बुचकळय़ात पाडतील, अशी ठिकाणे या शहरात आहेत. हा गोंधळ त्या व्यक्तीच्या अजाणतेपणामुळे नव्हे तर, सरकारी यंत्रणांच्या ‘नामकरण’ धोरणातील निबुद्धपणा आणि राजकारण्यांच्या अट्टहासामुळे होतो आहे. महात्मा गांधी, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक अशा थोर पुरुषांच्या नावाने मुंबईत अनेक रस्ते, चौक, उद्याने असून एकाच नावाच्या वेगवेगळय़ा ठिकाणांमुळे नागरिकांचा पुरता गोंधळ उडत आहे.
‘शहरातील प्रत्येक गल्ली, चौक आणि रस्त्याच्या नावामध्ये त्या भागाचा इतिहास दडलेला असतो. तो कधी सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय असतो तर कधी भौगोलिक. शहरातील विशिष्ट परिसराचे वैशिष्टय़ मार्गाचे, गल्ल्यांचे किंवा चौकांचे नामकरण करताना खरे तर जपले गेले पाहिजे,’ असे ‘अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिटय़ूट’चे कार्यकारी संचालक पंकज जोशी यांनी सांगितले. परंतु, असे न होता एखाद्या संताचे, नेत्याचे नाव निवडून अत्यंत सरधोपटपणे नामकरण केले जात असल्याचे दिसून येते. पण त्यामुळे, एकाच नावाची अनेक ठिकाणे शहरात आढळून येतात. अनेकदा एकाच नावाचे अनेक रस्ते किंवा चौक आजूबाजूच्याच परिसरात असल्याने निश्चित ठिकाणी धुंडाळताना गोंधळ उडतो. उदाहरणच द्यायचे झाले तर अहिल्याबाई होळकर मार्ग मानखुर्दमध्येही आहे आणि गोवंडी व विक्रोळीतही आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने माटुंगा, दादर, परळ या ठिकाणी मार्ग आहेत.
‘एकाच शहरात एकाच नावाची अनेक ठिकाणे असू नये, असे संकेत आहेत. किमान जागतिक पातळीवर महानगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत तरी हे संकेत पाळले गेले पाहिजे. परंतु, एकाच नावाचे अनेक रस्ते आणि चौक तेही आसपासच्या परिसरात आढळून येत असल्याने नवखी व्यक्ती गोंधळून जाते. म्हणून रस्त्यांना नावे देताना पालिकेने निश्चित धोरण आखले पाहिजे,’ अशी मागणी नगरसेवक दिलीप लांडे केली.
एकाच नावाचे चौक
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – चांदिवली, धारावी, दिंडोशी, कांदिवली(पू), कुर्ला(पू), पंतनगर, घाटकोपर(पू), टागोरनगर, विद्यानगरी, विद्याविहार, क्रांतिनगर.
* महात्मा गांधी नगर चौक – पवई
* शिवाजी चौक – मालाड (प), चारकोप, अंधेरी (पू)
एकाच नावाचे उद्यान
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर – वांद्रे(पू), चेंबूर, विक्रोळी पार्कसाइट, पवई, नेहरूनगर.
* टिळक उद्यान – गिरगाव चौपाटी, जुहू
* सरदार वल्लभभाई पटेल उद्यान- कांदिवली(प), शिवाजी-नगर, भांडुप(प), मालाड(प)
एकाच नावाचे काही मार्ग
* अहिल्याबाई होळकर मार्ग – मानखुर्द, गोवंडी, विक्रोळी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड – माटुंगा, दादर, परळ, चारकोप, खार (प), मालवणी, मुलुंड (प)
* महात्मा जोतिबा फुले मार्ग- नायगांव, मुलुंड (पू)
* महात्मा गांधी मार्ग – बोरिवली (प), धारावी, फोर्ट, गोरेगांव (प), कांदिवली (प), मुलुंड(प), सांताक्रुझ(प), विलेपार्ले(पू), घाटकोपर(पू)
* साईबाबा मार्ग – परळ, काळघोडा, सांताक्रुझ(प), खार(पू)
* श्री साईबाबा मार्ग – अभ्युदयनगर, काळाचौकी
* साईविहार पथ – उत्कर्षनगर, भांडुप
* साई हिल रोड – टेंभीनाका, भांडुप(प)
* समर्थनगर रोड – भांडुप(प)
* श्री समर्थ मार्ग – अंधेरी(प)
* संत ज्ञानेश्वर मार्ग – वांद्रे(पू), राजावाडी, जुहू, दहिसर(पू), उड्डाणपूल लालबाग.
* संत तुकाराम मार्ग – मस्जीद बंदर, जुहू, वांद्रे(पू)
* सरदार वल्लभभाई पटेल मार्ग – गिरगाव, जोगेश्वरी (पू), मुलुंड(पू), बोरिवली(प), विलेपार्ले(प)
* शिवाजी पार्क रोड – दादर(प)
* छत्रपती शिवाजी महाराज मार्ग – गेट वे ऑफ इंडिया, सांताक्रूझ(पू), सहार, दहिसर(पू)
* टिळक रोड – दादर(पू), घाटकोपर (पू), सांताक्रुझ(प), विलेपार्ले(पू)
* पं.जवाहरलाल नेहरू मार्ग – सांताक्रुझ (पू), घाटकोपर (प), विलेपार्ले(पू), मुलुंड (प)
मार्ग, चौकांचे नामकरण करण्याची विशिष्ट प्रक्रिया पालिकेने ठरवून दिली आहे. परंतु तीच तीच नावे वेगवेगळ्या ठिकाणांना दिली जात असतील तर या प्रक्रियेचा पुनर्विचार पालिकेने करावा. एखाद्या परिसराचे वैशिष्टय़ किंवा ओळख ठसविण्यासाठी नव्या नावाखाली कंसामध्ये जुने नाव दिले जावे, असा नियमही घालून देण्यात आला होता. परंतु हा नियम पाळला जात नाही.
– पंकज जोशी