‘सत्ताबाह्य़ केंद्रा’ला दुखावल्यानेच एसीबीची कारवाई?
सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाशिक येथील ‘करोडपती’ कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर याच्याकडे प्रचंड संपत्ती सापडल्याने अनेकांचे डोळे दिपले असले तरी असे अनेक ‘चिखलीकर’ सार्वजनिक बांधकाम विभागात वावरत आहेत. चिखलीकर अडकण्यामागे सार्वजनिक बांधकाम खात्यावर पूर्ण नियंत्रण असणाऱ्या कुटुंबातील ‘सत्ताबाह्य़ केंद्रा’ची नाराजी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच लाचलुचपतप्रतिबंधक विभागाला टीप देऊन कारवाई करण्यात आल्याची जोरदार चर्चा आता ऐकायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणाशी सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकाऱ्यांकडून हप्ते गोळा करणारा ‘एलटी’ आणि सत्ताबाह्य़ केंद्र जबाबदार असल्याचे बोलले जाते.
एकेकाळी भारतीय जनता पक्षातील बडय़ा नेत्यांचा ताईत असलेला ‘एलटी’ आता सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘सत्ताबाह्य़ केंद्रा’शी जवळीक साधून आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात या ‘एलटी’शिवाय पानही हलत नाही. आता या ‘एलटी’ला ‘एमव्ही’ आणि ‘एसएम’ येऊन मिळाले आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्यांसाठी बंगल्यावर मोठय़ा प्रमाणात किकबॅग पुरविण्याचे काम ‘एलटी’कडूनच केले जात होते. परंतु चिखलीकरने या ‘एलटी’विरुद्धच बंड पुकारले आणि त्याची त्याला शिक्षा भोगावी लागली, अशी कुजबुज ऐकायला मिळत आहे. तब्बल सात हजार कोटींचा अर्थसंकल्प असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागात प्रत्यक्ष कामाऐवजी टक्केवारीच अधिक असते. ही टक्केवारी ‘एलटी’मार्फतच ‘सत्ताबाह्य़ केंद्रा’कडे पोहोचत होती. परंतु चिखलीकरकडून अडचणी निर्माण केल्या जाऊ लागल्यानंतर मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत टीप देण्यात आली आणि मग नाशिक येथील एसीबी कार्यालयाने धडाडीने कारवाई सुरू केली. याआधी सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अभियंत्यांबाबत तक्रारी मिळूनही कारवाई न करण्याचा अलिखित आदेश देण्यात आला होता, याला तेथील सूत्रांनी दुजोरा दिला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत चिखलीकरवर कारवाई झालीच पाहिजे, असे बजावण्यात आले होते, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. या पैशातूनच वाशी येथे या सत्ताबाह्य़ केंद्राने दोन मोठे प्रकल्प राबविले आहेत. यामध्ये ‘एलटी’ आणि ‘एसएम’ हे दोन भागीदार आहेत. परंतु ‘सत्ताबाह्य़ केंद्रा’चे महत्त्व कमी होत आहे असे पाहताच आता एलटी आणि एसएम हे दोघेही वेगळे होऊ पाहत आहेत. यापैकी ‘एसएम’याला आता उंबरगाव येथून खासदार होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. एकेकाळी याच उंबरगावात कापडाचा व्यापार करणारा हा एसएम ‘एलटी’मुळेच ‘सत्ताबाह्य़ केंद्रा’च्या जवळ आला होता. आता स्वत:चे हेलिकॉप्टर बाळगणाऱ्या ‘एसएम’ने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घाटकोपर येथील आरटीओ, अंधेरी येथील मुद्रण कामगार नगर आदी प्रकल्पही पटकावले आहेत.
चिखलीकरच्या कामाची दक्षता पथकांमार्फत चौकशी
सतीश चिखलीकर याच्या काळात झालेल्या कामांची दक्षता पथकामार्फत चौकशी करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात चिखलीकरने कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर गोळा केलेले पैसे वरिष्ठांपर्यंत पोहोचवत असल्याची कबुली चिखलीकरने दिली असून त्याच्या डायरीतही काही वरिष्ठांची नावे असल्याचे बोलले जात आहे. चिखलीकरच्या या प्रतापांमुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराविषयीच संशय व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीस राज्यातील सर्व मुख्य आणि अधीक्षक अभियंते तसेच विभागाचे सचिव श्यामल मुखर्जी उपस्थित होते. त्यात चिखलीकरच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्व कामांच्या दर्जाची दक्षता पथकाच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चौकशीत कामांची गुणवत्ता योग्य नसल्याचे आढळल्यास संबधित अन्य अभियंत्यांवरही कारवाई करण्याचा तसेच यापुढे कोणत्याही कामाच्या दर्जाबाबत कोणाची तक्रार आली तर संबधित अधिकाऱ्यांची गय करणार नाही, असा इशारा भुजबळ यांनी दिला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर पत्नी हजर
नाशिक : सतीश चिखलीकर यांच्या अटकेनंतर अचानक गायब झालेली त्यांची पत्नी मंगळवारी आश्चर्यकारकपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर हजर झाली. त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून चिखलीकर यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये जे नातेवाईक वा खासगी व्यक्तींचा संबंध आहे, त्या सर्वाना नोटीस बजावण्यात आल्याचे या विभागाने म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता चिखलीकर आणि शाखा अभियंता जगदिश वाघ यांना ठेकेदाराकडून लाच घेताना पकडल्यानंतर त्यांच्याकडील कोटय़वधीची माया समोर आली आहे. संशयितांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या अवैध मालमत्तेच्या छाननीचे काम हाती घेतले. या घडामोडी सुरू असताना चिखलीकर यांची पत्नी स्वाती या अचानक गायब झाल्या. चौकशीसाठी त्यांना तीनवेळा नोटीस बजावण्यात आली. परंतु, त्या हजर झाल्या नाहीत. यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असताना मंगळवारी त्या अचानक या विभागाच्या कार्यालयात हजर झाल्या. चौकशी पथकाने स्वाती चिखलीकर यांची प्राथमिक चौकशी केल्याची माहिती या विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिली. चिखलीकरने ज्या ज्या ठिकाणी बदली झाली, त्या सर्व ठिकाणांसह नवी मुंबई व पुणे येथेही मालमत्तेत गुंतवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे. ही मालमत्ता नातेवाईक व काही खासगी व्यक्तींच्या नांवे खरेदी करण्यात आली. या प्रकरणाशी संबंधित अशा सर्व घटकांनानोटिसा बजावण्यात आल्याचे महावरकर यांनी सांगितले.