मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन अनुकूल असून, त्याबाबत शासनाकडून न्यायालयात बाजू मांडण्यात येईल व मराठा समाजातील वंचितांना आरक्षण मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिवजयंती उत्सवानिमित्त शिवनेरीवर आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, शिवरायांची स्मारके असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचा प्रकल्प रेंगाळल्याची टीका विरोधक करतात, मात्र विरोधकांना अनेक वर्ष सत्तेत असताना स्मारकाची साधी परवानगी मिळवता आली नाही. आता या स्मारकाच्या परवानगीची कामे मार्गी लागली असून, प्रत्यक्षात दोन महिन्यात भूमिपूजन करू.

 

सरकारी शिवजयंती साजरी, शिवसेना दूरच
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले. सरकारी तारखेनुसार शिवसेना शिवजयंती साजरी करीत नसल्याने सरकारमध्ये राहूनही शिवसेनेने दूर राहणे पसंत केले. निवडणूक काळात उठता-बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजप सरकारमधील नेत्यांना निवडणुका संपल्यानंतर शिवाजी महाराजांचा विसर पडला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

Story img Loader