भाजपच्या डोकेदुखीत वाढ; आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मोठे आव्हान
पटेल समाजाच्या नाराजीचा फटका भाजप अध्यक्ष अमित शहा यांना बसला असतानाच राज्यातही मराठा समाजातील नाराजी सत्ताधारी भाजपसाठी तापदायक ठरणारी आहे. महाराष्ट्र किंवा गुजरातमधील प्रस्थापित समाज विरोधात जाणे हे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपकरिता मोठे आव्हान ठरणार आहे.
सूरतमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांची सभा पटेल समाजाच्या कार्यकर्त्यांनी उधळली. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष शहा यांचा दरारा आहे, पण पटेल समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहा यांना थेट आव्हान दिले आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षांच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. पटेल पाटीदार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाजपकरिता त्रासदायक ठरू शकतो, कारण गेल्या २० वर्षांपासून पटेल समाजाने नेहमीच भाजपला साथ दिली आहे. पटेल समाजाची नाराजी असतानाच नेतृत्वबदल करताना भाजपने पटेल समाजाला मुख्यमंत्रिपद नाकारले. हा मुद्दाही भाजपकरिता अडचणीचा ठरू शकतो. पटेल समाजाच्या हिंसक आंदोलनानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा फटका बसला व काँग्रेसला यश मिळाले.
गेल्या वर्षी बिहारमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. उत्तर प्रदेशमध्ये यशाची तेवढी खात्री नाही. यापाठोपाठ गुजरातमध्ये जागा कमी झाल्या वा फटका बसल्यास २०१९च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपकरिता आव्हानच राहील.
राज्यात सध्या मराठा समाजाचे मोठाले मोर्चे निघत आहेत. कोणतेही नेतृत्व नसताना मोच्र्याना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सारेच राजकीय पक्ष हादरले आहेत. समाजातील खदखद कोपर्डीच्या निमित्ताने बाहेर आली. दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा किंवा आरक्षण हे मुद्दे मोच्र्याच्या निमित्ताने मांडले जातात. मराठा समाजातील नाराजीचा फटका मुख्यत्वे भाजपला बसणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकणे कठीण होते, पण त्याचे सारे खापर भाजपवर फोडले जात आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. समाजाची नाराजी दूर करण्याकरिता सत्ताधारी भाजपकडून अद्याप तरी काही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. मोच्र्याच्या निमित्ताने राजकारण करू नये, असे आवाहन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय रंग येऊ नये या दृष्टीने प्रयत्न केले. साखर, ऊस हे प्रश्न सध्या ज्या पद्धतीने हाताळले जात आहेत त्यावरूनही शेतकरी वर्गात भाजपबद्दल नाराजी वाढत आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या ७४ जागा असून, गेल्या निवडणुकीत यापैकी ६८ जागा भाजपला (राज्यात शिवसेनेच्या जागांचा समावेश) मिळाल्या होत्या. मराठा किंवा पटेल समाजाची नाराजी कायम राहिल्यास भाजपच्या मतांवर परिणाम होऊ शकतो.