मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मुंबईत ९ ऑगस्ट रोजी विराट मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे प्रतिबिंब उमटणार आहे. सत्ताधारी पक्षाला मराठा आरक्षणाबाबत जबाब द्यावा लागणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मुंबईत युवकांकडून मोटारसायकल मार्च काढून वातावरण निर्मिती केली जात आहे. मुंबईतील हा मराठा मूक मोर्चा अभूतपूर्व असेल, असा संयोजकांच्या वतीने दावा करण्यात येत आहे.

राज्यातील विविध शहरांमध्ये गेले वर्षभर विविध शहरांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अन्य मागण्यांसाठी लाखोंचे मूक मोर्चे काढण्यात आले. मुंबईत शेवटचा मोर्चा काढण्याचे ठरले होते. परंतु काही कारणाने मोर्चा लांबणीवर पडला होता. आता विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील मोर्चा यशस्वी करण्यासाठी मुख्य संयोजन समितीसह विविध २८ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील तसेच अन्य राज्यातील मराठा समाज मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहे. त्यासाठी जनजागृती करण्याचा एक भाग म्हणून मुंबईत रविवारी घाटकोपर, अंधेरी, दक्षिण मुंबई व नवी मुंबईत युवकांचे मोटारसायकल मार्च काढण्यात आले. त्याशिवाय अशाच प्रकारचे मार्च पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, चिपळूण, रत्नागिरी, इत्यादी शहरांमध्ये काढण्यात आले. या पूर्वी अन्य शहरांमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाप्रमाणे मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चा असेल. अतिशय शिस्तबद्ध रीतीने मोर्चा काढण्याची व तो यशस्वी करण्याची आखणी करण्यात आली आहे. ९ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून हा मोर्चा निघणार आहे व आझाद मैदानावर थांबणार आहे. संयोजन समितीने मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी एक आचारसंहिता जारी केली आहे. हा मूक मोर्चा आहे. त्यात कोणत्याही घोषणा दिल्या जाणार नाहीत. मोर्चात अधिकृत बॅनर्सशिवाय इतर कोणतेही वैयक्तिक, संस्था वा संघटनांचे बॅनर असणार नाहीत. हा मोर्चा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही, मराठय़ांच्या मागण्यांसाठी व आत्मसन्मानासाठी आहे. कुणालाही त्रास होणार नाही असे वर्तन राहील, अशा प्रकारची आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्याचे सर्वानी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उद्यापासून पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होईल. मराठा मोर्चाचे प्रतिबिंब अधिवेशनात उमटणार आहे.

मुंबईत ९ ऑगस्टला काढण्यात येणाऱ्या मराठा मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यात रविवारी मोटारसायकल फेरी काढण्यात आली होती. या फेरीद्वारे मोर्चासाठी वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे.

Story img Loader