मराठा आरक्षणाबाबत दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायलयाने वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणासह अन्य प्रकरणातही यापूर्वीच जामीन मिळाला असल्याने मंगळवारी संध्याकाळी सदावर्ते यांची आर्थर रोड कारागृहातून सुटका करण्यात आली. न्यायालयाने सदावर्ते यांना २५ हजार रुपयांच्या हमीवर अटकपूर्व जामीन मंजूर करत ४,५ आणि ६ मे रोजी पुणे पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले. दरम्यान १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी अजब दावे केले आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांनी आपण जेलमध्ये असताना फक्त पाण्यावर होतो असा दावा केला आहे. “सरकारला काय करायचं ते करु दे पण तत्वं सोडायची नाहीत. लॉकअपमध्ये गेल्यापासून मी फक्त पाण्यावर आहे. येणाऱ्या काळात कष्टकऱ्यांसाठी लढणार आहेत. माझी मुस्कटदाबी केली तरीही मी मागे फिरलो नाही,” असं ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंची १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका, बाहेर पडताच म्हणाले, “हम है…”

“मी कष्ट करणाऱ्यांसाठी काम करणारा आहे. मी जेल नाही तर त्याला सत्याग्रह मानतो. माझ्या वडिलांना मोठा काळ सामान्य नागरिकांसाठी जेलमध्ये जावं लागलं होतं, त्यांचा आदर्श माझ्यासमोर आहे,” असं गुणरत्न सदावर्ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचं सांगितलं.

“मी मराठा समाज म्हणून विरोध केलेला नाही. असंविधानिक पद्धतीने जे आरक्षण देण्यात आलं होतं त्याविरोधात आमचा लढा होता. मी जात पाळत नाही. लाखो मराठा बांधव माझ्यासोबत आहेत. मला जातीसोबत जोडू नका,” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

घऱात पैसे मोजण्याची मशीन सापडल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “एक रुपयाचा व्यवहार करतानाही चोरीमारी करु नये अशी शिकवण आईने दिली आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने आम्ही पैसे घेत नाही. जी काही थोडी फी मिळते तीदेखील आम्ही कायदेशीरदृष्ट्या पाहून घेणारे आहोत”.

जेलमध्ये असताना आपण एसटी कामगारांना पत्र लिहिलं. त्यांना घाबरु नका, कामावर जा असं मी त्यांनी सांगिलं असा दावा यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला. “माझ्यामुळे कोणाचीही नोकरी धोक्यात आली नाही. जे लोक हे कष्टकरी गिरणी कामगार होतील म्हणत होते ते कुठे गेले?,” अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.