काँग्रेसचे भाजपवर टीकास्त्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे टीकास्त्र काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोडले आहे. या निर्णयासाठी सरकारला चार वर्षे का लागली, असा सवालही त्यांनी केला.
मराठा समाजाच्या असंतोषाचा भडका उडाल्यावर आणि त्याचे चटके बसायला लागल्यावर सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. तर मराठा समाजाचे मोर्चे, काहींनी दिलेले बलिदान व विरोधी पक्षांचे आंदोलन यापुढे सरकारला झुकावे लागले, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात दिलेल्या आरक्षणाप्रमाणेच भाजप सरकारने आरक्षण दिले असल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उच्च न्यायालयाने आधीच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने या सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे हा मुद्दा सोपविला. पण आयोगाच्या कामकाजासाठी सुरुवातीला आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे आरक्षणास विलंब लागला. भाजपचे निर्णय निवडणुकीकडे डोळा ठेवूनच असतात. हा निर्णयही तसाच आहे.
मराठा समाजाचे अभिनंदन करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात वेळकाढूपणा केला. त्यामुळे मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले व ४० तरुणांनी बलिदान केले. काँग्रेसच्या आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर विधिमंडळात आज शिक्कामोर्तब झाले आहे.
मराठा समाजाच्या संघर्ष व बलिदानाचा हा विषय असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी मराठा आरक्षण विधेयकाचे स्वागत केले.