मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील कावळे या आंदोलनाने मुंबईत आत्महत्या केली असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिली. त्यांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट करून माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, अशी पोस्ट विनोद पाटील यांनी केली आहे.

तसंच, “माझी सर्व तरुणांना विनंती आहे की मागच्या काळात ४८ जणांचे बलिदान गेले. त्यांचे कुटुंब आता वाऱ्यावर आहेत. तरुणांनो हे आरक्षण आपल्या हक्काचं आणि भविष्यासाठी आहे. त्यामुळे सर्वांनी संयम ठेवा. माझ्यासकट सर्वांनी संयम ठेवण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायला हवा. पण या क्रूर राज्य सरकारलाही जाग आली पाहिजे, ४८ पेक्षा जास्त तरुणांनी बलिदान केलं, आज एक बलिदान झालं. काय केल्याने यांना आमची भाषा कळेल? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

“चार चार मुख्यमंत्री राज्यात येऊन गेले. पृथ्वीराज चव्हाण आले, आरक्षण कोर्टात टिकलं नाही. फडणवीस आले त्यांचं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं पण सर्वोच्च न्यायालायत टिकलं नाही. उद्धव ठाकरे आले त्यांच्या कार्यकाळात रद्द झालं. एकनाथ शिंदे येऊन दीड वर्षे झालं तरी आरक्षण मिळालेलं नाही. क्षणाचाही विलंब न करता या घनटेची जबाबदारी घेऊन पुढे आलं पाहिजे आणि टिकाणारं आरक्षण देण्याचं वक्तव्य केलं पाहिजे. समाजातील तरुणांचा विश्वास संपला आहे. हे आपल्याला आरक्षण देत नाहीत, मिळालेलं टिकत नाही म्हणून तरुण द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे सरकारने तत्काळ जबाबदारी स्वीकारावी. ही सर्व परिस्थिती आम्हाला परवडणारी नाही”, असंही ते म्हणाले.

“सुनील कावळे जालना जिल्ह्यातील आहेत. त्यांचा पुतण्या शिवा एसटी कॉलनीत राहतो, तो संभाजी नगरचा आहे. त्यांचे बंधू गावाकडे राहतात. गावाकडून सांगून गेले की मी मुंबईला जाऊन येतो आणि मुंबईत त्यांनी आत्महत्या केली”, असंही ते पुढे म्हणाले. तसंच, “मुंबईसारख्या राजधानी जाऊन आत्महत्या केली तरच दखल घेतली जाईल अशी त्यांची धारणा असेल”, असंही विनोद पाटील म्हणाले.

अशोक चव्हाणींनीही वाहिली श्रद्धांजली

“मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय असलेले सुनील कावळे यांच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की, कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नका. आपले आयुष्य संपवून मराठा आरक्षण मिळणार नाही, तर त्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने लढा द्यावा लागणार आहे. त्यासोबतच माझी केंद्र व राज्य सरकारलाही विनंती आहे की त्यांनी मराठा कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांची गंभीर दखल घ्यावी आणि मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत”, असं ट्वीट राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

राजकारण पेटणार?

मराठा आरक्षणावरून आधीच राजकारण तापलेलं आहे. त्यातच, आता मराठा आंदोलकाने आत्महत्या केल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे. याबाबत सरकार पातळीवर काय निर्णय़ घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation protester committed suicide in mumbai claimed by vinod patil sgk