मराठा आरक्षणाच्या मुद्दावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. राज्य सरकारने संभाजीराजे यांना चर्चेसाठी निमंत्रण धाडलं असून प्रतिनिधी वर्षावर चर्चेला जातील असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे. तिथे जर निर्णय होऊ शकला नाही तर पुन्हा माझ्याशी प्रतिनिधी चर्चा करतील अशी माहिती राजे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत दिली. असं असलं तरी आरक्षणचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत उपोषण मागे घेण्यास संभाजीराजे यांनी स्पष्ट नकार दिला आहे.
” मराठा आरक्षणबाबत २२ मागण्या पुढे आल्या, त्यापैकी ६ मागण्या आम्ही मांडल्या आहेत. या मागण्यांवर राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं, यासाठी केंद्र सरकारकडे जाण्याची गरज नाही. तसंच या मागण्यांसाठी न्यायालयाचे कोणते निर्बंध आहे असेही काही नाही, याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. मी उपोषण करत आहे, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय,” असं खासदार संभाजीराजे म्हणाले. दरम्यान कोणीही कायदा हातात न घेण्याचे आवाहन संभाजी राजे यांनी यावेळी केले.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आज सकाळी संभाजीराजे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून अशक्तपणा व तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत असल्याचं संभाजी राजे यांनी सांगितलं. डॉक्टरांनी सल्ला दिला असला तरी कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास संभाजीराजेंनी नकार दिला आहे.