मराठा मोर्चाची प्रतिक्रिया म्हणून मराठेतर मतांचे झालेले ध्रुवीकरण आणि इतर समाज पक्षापासून दूर जाऊ लागल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बुधवारी चिंता व्यक्त करण्यात आली.
आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका तसेच नगरपालिका निकालांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नेतेमंडळींची बैठक आयोजित करण्यात आली होती. नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. याबद्दल आढावा घेण्यात आला. यश मिळालेल्या जिल्ह्य़ांतील निरीक्षकांकडून माहिती घेण्यात आली. नगरपालिका निवडणुकांच्या निकालांच्या आधारे आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये दुरुस्त्या कराव्यात, अशी सूचना पवार यांनी केली.
मराठा मोर्चाना पक्षाचा पाठिंबा असल्याचे चित्र निर्माण झाले. यामुळे इतर मागासवर्गीय, दलित समाज विरोधात गेला.
त्याचाही फटका नगरपालिका निवडणुकीत बसल्याचे काही नेत्यांचे म्हणणे होते. भाजपने सत्तेचा वापर करीत पक्ष संघटना वाढीकरिता प्रयत्न सुरू केल्याचा मुद्दा चर्चेत आला. इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र खाते निर्माण करून सरकारने या समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मराठा मोर्चामुळे इतर समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण झाले आणि इतर समाजांचे ध्रुवीकरण झाल्याबद्दल काही नेत्यांनी चिंता व्यक्त केली.
भाजपबरोबरच्या वाढत्या जवळीकीबद्दल पक्षावर टीका केली जाते. पक्षाचे त्यातून नुकसान होते, असा मुद्दा मांडण्यात आला. हा अपप्रचार असून, पक्षाने उलट केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर वारंवार टीका केल्याकडे नेतृत्वाकडून लक्ष वेधण्यात आले.