मकरसंक्रांतीत पतंगाच्या मांज्यामध्ये अडकून पक्ष्यांचे होणारे दुर्दैवी मृत्यू कमी करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांबरोबर या वर्षी मराठी कलाकारांनीही झेप घेतली आहे. ‘अ‍ॅनिमल मॅटर्स टू मी’ या स्वयंसेवी संस्थेने सुरू केलेल्या ‘पक्षी वाचवा’ मोहिमेमध्ये परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, सुयश टिळक, सुकन्या कुलकर्णी, मुक्ता बर्वे, शर्मिष्ठा राऊत या मराठी कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेमुळे जखमी पक्षी व भटक्या कुत्र्यांना आधार देण्याची संधी मिळणार असल्याचे समाधान असले तरी लोकांनी पतंग उडविण्यासाठी घातक मांज्याचा वापर करू नये असे आवाहन केले आहे.
मराठी कलाकारांना घेऊन पक्षी वाचवा मोहीम राबविण्याची पहिलीच वेळ असून यामुळे लोकांवर याचा प्रभाव पडेल असे या संस्थेचे संस्थापक गणेश नायक यांनी सांगितले. ही मोहीम १४ ते २० जानेवारी या कालावधीत राबविण्यात येत असून यामध्ये साधारण १५० तरुण स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. दरवर्षी या मांज्यामध्ये अडकून स्वत:ला सोडवू न शकल्यामुळे हजारो पक्ष्यांची हत्या होते. यासाठी पक्षीप्रेमींनी पतंगाचा मोह आवरा असे आवाहन केले आहे. चिनी मांज्याच्या वापराने त्याबरोबरच काचेचे कोटिंग असलेल्या मांज्यामुळे पक्षी मोठय़ा प्रमाणात जखमी होतात. यामध्ये बऱ्याचदा पक्ष्यांचा गळा कापला जातो, त्यांचे पंख छाटले जातात तर कित्येक पक्ष्यांच्या अंगावर मांज्याच्या जखमा दिसून येतात. मागील वर्षी या संस्थेमध्ये ७०० पक्षी जखमी झाल्याची नोंद आहे. यासाठी पक्षी वाचवा या मोहिमेद्वारे जखमी पक्षी दिसल्यास ‘अ‍ॅनिमल मॅटर्स टू मी’ या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क केल्यास अशा पक्ष्यांना वाचवले जाऊ शकते. सण साजरा करताना त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाणे गरजेचे आहे त्याबरोबरच असा घातक मांज्याचा वापर न करता आनंदाने ही मकरसंक्रांत साजरी करावी अशी विनंती पक्षीप्रेमीं व स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. स्वयंसेवी संस्थांनी फेसबुकच्या माध्यमातून ‘पक्षी वाचवा’ मोहिमेचा प्रसार सुरू केला आहे. त्यामुळे जखमी पक्षी आढळल्यास या संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक(९८२११३४०५६) कळवल्यास तातडीने पक्ष्यांवर उपचार केले जाऊ शकतात अशी विनंती ‘अ‍ॅनिमल मॅटर्स टू मी’ संस्थेच्या अंकिता पाठक हिने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राणी व पक्षी हा पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राणी-पक्ष्यांना वाचवण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे जे आपण निर्माण करू शकत नाही ते संपवण्याचा आपल्याला आधिकार नाही. मला प्राणी-पक्ष्याांबद्दल अतिशय जिव्हाळा आहे. त्यामुळे या मूक प्राण्यांसाठी या संस्थेच्या माध्यमातून आपण काहीतरी करू शकतो याचा आनंद नक्कीच आहे. प्राणी-पक्षी हे निरागस आहेत. त्यामुळे मकरसंक्रांतीत पतंग उडविण्यासाठी चायना मांज्याचा वापर न करता साध्या घातक नसणाऱ्या मांज्याचा वापर करावा ही सर्वाना विनंती आहे.
-मधुगंधा कुलकर्णी, अभिनेत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor become active for birds save