मुंबई : जगण्याची नवी उमेद देणाऱ्या प्रेरणादायी ‘अनन्या’ला एकांकिका, नाटक आणि चित्रपट माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणारे मराठमोळे दिग्दर्शक प्रताप फड हे सध्या ‘ब्लॅक वॉरंट’ या वेबमालिकेमुळे चर्चेत आले आहेत. या वेबमालिकेत त्यांनी साकारलेली ‘सनी त्यागी’ ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. संवादफेकीऐवजी देहबोलीतून व्यक्त होत सनी त्यागीची भूमिका साकारणाऱ्या प्रताप फड यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिहार तुरुंगाच्या भिंतींमागील अपरिचित भयाण वास्तव मांडणारी ‘ब्लॅक वारंट’ ही हिंदी वेबमालिका काही सत्यघटनांवर आधारित आहे. तुरुंगातील कैद्यांमध्ये होत असलेली मारामारी आणि रक्तरंजितपणाचा थरार हा नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झालेल्या ‘ब्लॅक वॉरंट’ या वेबमालिकेतून मांडण्यात आला आहे. या वेबमालिकेतील सनी त्यागी हे पात्र बहुसंख्य मोठ्या गँगस्टरचे प्रतिकात्मक स्वरूपात वर्णन करणारे आहे. सनी त्यागी हा एक मोठा गँगस्टरदहशतीच्या जोरावर तुरुंगात दबदबा निर्माण करतो आणि इतर कैद्यांना सोबत घेऊन तुरुंगावर एकप्रकारे राज्य करतो. हा गँगस्टर कमी बोलतो, त्यामुळे त्याची दहशत ही संवादाऐवजी त्याच्या नजरेतून आणि एकूणच देहबोलीतून निर्माण झालेली आहे. तसेच इतर कैद्यांच्या टोळ्या आणि तुरुंगाधिकाऱ्यावरही त्याचा दबाव असतो. एकूणच हे पात्र प्रताप फड यांनी मोठ्या खुबीने साकारले असून त्यांच्या अभियानाचे कौतुक होत आहे. ‘ब्लॅक वॉरंट’ या वेबमालिकेचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी आणि सत्यांशु सिंग यांनी केले आहे. तर झहान कपूर, राहुल भट, परमवीर सिंह चीमा, अनुराग ठाकुर, सिद्धांत गुप्ता, राजश्री देशपांडे आदी कलाकार या वेबमालिकेत आहेत.

‘भावेश जोशी – सुपरहिरो’ या चित्रपटाच्या माध्यमातून विक्रमादित्य मोटवानी यांच्यासोबत मी काम केले होते, त्यामुळे त्यांच्या कामाची शैली माहिती होती. त्यांच्यासोबत पुन्हा ‘ब्लॅक वॉरंट’ या वेबमालिकेत काम करायला मिळणे, ही एक कलाकार म्हणून माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती. सनी त्यागीची भूमिका साकारणे काहीसे आव्हानात्मक होते, मात्र छोट्या स्वरूपात गोष्टी करून एखादे पात्र प्रभावी कसे करायचे, हे विक्रमादित्य मोटवानी यांच्याकडून नेहमीच शिकायला मिळते. त्यांच्याबरोबर काम करताना एक कलाकार म्हणून घडत जातो. ‘ब्लॅक वॉरंट’ या वेबमालिकेत काम करण्याच्या एकूणच अनुभव अप्रतिम होता’, असे प्रताप फड यांनी सांगितले.

१९८० च्या दशकात सुनील गुप्ता हे तिहार तुरुंगाचे तुरुंगाधिकारी होते. त्यांचे अनुभव त्यांनी आणि पत्रकार सुनेत्रा चौधरी यांनी ‘ब्लॅक वॉरंट : कन्फेशन्स ऑफ अ तिहार जेलर’ या पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणले. त्यावर ही वेबमालिका आधारित आहे. त्यामुळे सुनील गुप्ता नावाचा अधिकारी तिहार जेलमध्ये नियुक्त झाल्यानंतर वास्तवाला कसे सामोरे जातो, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर टाकलेल्या दडपणाचा कसा सामना करतो, हे वेबमालिकेत मांडण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor pratap phad praised for his acting as sunny tyagi in black warrant web series mumbai print news css