मुंबई : ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेल्या पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ या चित्रपटातील अभिनेत्री छाया कदम यांच्या अभिनयाला उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून अभिवादन केले. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांची अशी दाद मिळवणाऱ्या आणि या महोत्सवात एकाच वेळी दोन महत्त्वाच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या छाया कदम यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> न कळवताच अशोक सराफांना चित्रपटातून काढलं; महेश कोठारेंनी दिली ‘त्या’ चुकीची कबूली; म्हणाले…
कान आंतरराष्ट्रीय महोत्सवात छाया कदम यांच्या भूमिका असलेले ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ आणि ‘सिस्टर मिडनाईट’ असे दोन चित्रपट दाखवण्यात आले. यापैकी ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ हा चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. एकाच वेळी दोन चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रदर्शित होण्याचा मान मिळवणाऱ्या आणि प्रेक्षकांकडून जाहीर कौतुकाचा बहुमान मिळवणाऱ्या छाया कदम या पहिल्या मराठी अभिनेत्री ठरल्या आहेत. हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी प्रसिध्द नाट्यकर्मी वामन केंद्रे यांच्या रंगपीठ थिएटर आणि श्री शिवाजी स्मारक ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने रविवारी, ९ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात त्यांचा सत्कार सोहळा आणि प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> १० वर्षांनी पहिल्यांदाच नेटफ्लिक्समध्ये होणार बदल, काय ते जाणून घ्या
छाया कदम यांनी रंगपीठ थिएटरमधूनच अभिनयाचे धडे घेतले. वामन केंद्रे यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या छाया यांनी रंगपीठ थिएटरच्या ‘झुलवा’ या नाटकात पहिली भूमिका केली. या नाटकाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात झाली. त्यानंतर त्यांनी ‘फँड्री’, ‘सैराट’ ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मडगाव एक्स्प्रेस’, ‘लापता लेडीज’ सारख्या मराठी – हिंदी चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारत आपली ओळख निर्माण केली. या अभिनेत्रीच्या सन्मान सोहळ्यास व तिची जाहीर मुलाखत ऐकण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शिवाजी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत व रंगपीठ थिएटरच्या अध्यक्षा गौरी केंद्रे यांनी केले आहे. छाया कदम यांची मुलाखत अक्षय शिंपी व पल्लवी वाघ घेणार असून सुप्रसिद्ध निवेदिका मृण्मयी भजक या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. सदर कार्यक्रम विनामूल्य असून सर्व रसिकांसाठी खुला आहे.