अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, दिंडोशी असा विस्तारलेल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीत कडवी लढत होणार आहे. ठाकरे गटाकडून या जागेवरून अमोल कीर्तिकरांना संधी मिळण्याची शक्यता असून महायुतीकडून ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली आहे. या जागेवरून एका मराठी अभिनेत्रीला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने टाईम्स नाऊने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी, उत्तर भारतीय, गुजराती, मुस्लीम, दलित, ख्रिश्चन असे संमिश्र मतदार असलेल्या या उत्तर पश्चिम मतदारसंघावरून महाविकास आघाडी तसेच महायुतीतही वाद, अंतर्गत कुरघोड्या बघायला मिळतात. २०१४ आणि २०१९ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन किर्तीकर निवडून आले होते. तब्येत साथ देत नसल्याने मध्यंतरी किर्तीकर फारसे सक्रिय नव्हते. पण शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात गेल्यावर किर्तीकर एकदमच सक्रिय झाले आहेत. त्यांची पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत. अमोल किर्तीकर हे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे येथे पिता-पुत्रांची लढत पाहायला मिळणार अशी चर्चा होती. परंतु, शिंदे गटाने या जागेवरून एका मराठी अभिनेत्रीला संधी देण्याचं ठरवलं आहे.

या जागेवर सुरुवातीला भाजपाने दावा केला होता. यासाठी स्थानिक आमदार किंवा एखाद्या कलाकाराला भाजपा संधी देण्याच्या तयारीत होती. परंतु, आता ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली असून तेही मराठी अभिनेत्रीला संधी देणार असल्याची शक्यता आहे.

जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सध्या दोन ठाकरे गटाचे आमदार असून तीन भाजपाचे आहेत आणि एक शिंदे गटाचा आमदार आहे.

हेही वाचा >> शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची खेळी! उद्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये प्रवेश

महाविकास आघाडीतून अमोल किर्तीकरांना मिळणार संधी?

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात गजनन किर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत. तर त्यांचे पूत्र अमोल किर्तीकर हे सध्या ठाकरे गटात आहेत. त्यामुळे ही जागा ठाकरे गटाला मिळून अमोल किर्तीकरांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसचे संजय निरुपमही या जागेवरून इच्छूक आहेत. गेल्या वेळी त्यांनी किर्तीकर यांच्या विरोधात निवडणूक लढविली असता त्यांना तीन लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. पण शिवसेनेच्या ठाकरे गटाने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. ठाकरे गटाला किर्तीकर यांचे पुत्र अमोल यांच्यासाठी हा मतदारसंघ हवा आहे. उत्तर पश्चिम काँग्रेसने हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा, अशी मागणी लावून धरली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सध्या थंडावली आहे. यामुळे आघाडीत हा मतदारसंघ कोणाला सुटतो यावर बरेच काही अवलंबून असेल. हा मतदारसंध काँग्रेसला मिळणार नसल्यास संजय निरुपम हे सुद्धा काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अमोल किर्तीकर यांना उमेदवारी नाकारली तर तेही पक्षात थांबतील का, याची ठाकरे गटाला भीती आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress to get candidacy from this lok sabha constituency in mumbai shinde group strategy sgk
Show comments