‘महामार्गा’तून ‘समृद्धी’; ठाणे जिल्ह्य़ात शेतजमिनीस हेक्टरी दोन कोटींचा भाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सुमारे ४६ हजार कोटी रुपये खर्चाच्या बहुचर्चित मुंबई-नागपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी (समृद्धी महामार्ग) सर्वाधिक विरोध झालेल्या ठाणे जिल्ह्य़ातील शेतजमिनीला हेक्टरी दोन कोटी तर बिगरशेत जमिनीला हेक्टरी १० कोटी रुपयांचा घसघशीत भाव देऊन शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. राज्यातील कोणत्याही प्रकल्पासाठी देण्यात आलेला हा सर्वाधिक मोबदला असून आता शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास असलेला विरोध मावळेल अशी अपेक्षा आहे. येत्या १५ जुलै रोजी शहापुरात पहिल्या खरेदी व्यवहाराची नोंदणी करण्याची तयारी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरू केली आहे.
मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची तीन वर्षांत बांधणी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तब्बल १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागातील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्य़ातील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे. मुख्य महामार्गासाठी ८ हजार ५२० हेक्टर तर रस्त्यालगतच्या विविध सुविधांसाठी म्हणजेच फूडमॉल, पंप आणि पार्किंगसाठी १५०० हेक्टर जमीन लागणार आहे. त्याचप्रमाणे ४५० हेक्टरवर एक याप्रमाणे २४ नवनगरांसाठी १० हजार ८०० हेक्टर अशी एकूण २० हजार ८२० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यापैकी १७ हजार ४९९ हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आता केंद्र सरकारच्या २०१३ च्या नवीन भूसंपादन अधिनियमान्वये खाजगी वाटाघाटीद्वारे खेरदी करण्यात येणार आहे. त्यासाठी गावनिहाय जमिनीचे दर निश्चित करताना त्या भागात गेल्या तीन वर्षांत झालेले उच्चांकी खरेदी-विक्री व्यवहार किंवा रेडी रेकनरचे दर यापैकी अधिक असलेले दर विचारात घेण्यात आले असून त्यावर २५ टक्के वाढीव मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या सूत्रानुसार ज्या जिल्ह्यांतून हा प्रकल्प जात आहे, तेथील थेट वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीसाठीचे दर जाहीर करण्यात आले आहेत.
हा महामार्ग जाणाऱ्या शहापूर, कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील शेतजमीन आणि बिगरशेतीचे दर एमएसआरडीसीने निर्धारित केले आहेत. त्यानुसार शहापूर तालुक्यातील जमिनीस सर्वाधिक भाव मिळणार आहे. मात्र कल्याणमध्ये हा भाव काहीसा कमी असेल असे सूत्रांनी सांगितले. बीरवाडीत शेतीसाठी हेक्टरी एक कोटी ८० लाख, तर बिगरशेतीसाठी १६ कोटी ७१ लाख, दळखण, लाहेमध्ये शेतीसाठी दोन कोटी रुपये हेक्टरी दिले जाणार आहेत. तर शेतजमिनीसाठी किमान दर हेक्टरी चांदेमध्ये ५२ लाख, वशाळा बु. ७३ लाख, खुटाडीत ७६ लाख, धामणीत ९३ लाख असा दर दिला जाणार आहे. बिनशेतीसाठी लाहेमध्ये हेक्टरी १० कोटी रुपये दिले जाणार आहे. आजवरचा हा सर्वात मोठा दर असल्यामुळे या प्रकल्पास होणारा विरोध मावळेल असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केला.
शुक्रवारी पवार- मुख्यमंत्री बैठक
समृद्धी महामार्गास जमीन देण्यास शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, या प्रकल्पाविरोधी शेतकरी संघर्ष समितीचे प्रतिनिधी आणि मुख्मयंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्य़ाद्री अतिथिगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीतच समृद्धी महामार्गाचे भवितव्य निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.