कुसुमाग्रजांच्या काही निवडक कविता ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या स्वरात ऐकण्याचा दुर्मिळ योग ‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने जुळून येणार आहे. परचुरे प्रकाशन संस्थेने हा योग जुळवून आणला असून याच सोहळ्यात कुसुमाग्रजांवरील ‘सौदर्याचे उपासक’ या ग्रंथाचे प्रकाशनही केले जाणार आहे.
२७ फेब्रुवारी हा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील या दिग्गज व्यक्तिमत्वावर आत्तापर्यंत विविध स्वरूपात लेखन झाले आहे. कुसुमाग्रज हे व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून कसे होते ते आणि त्यांचे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी या लेखांच्या माध्यमातून उलगडले आहे. आत्तापर्यंत विखुरलेल्या स्वरूपातील हे लेखन आम्ही ‘सौदर्याचे उपासक’ या ग्रंथातून एकत्र केले आहे. त्याचे संकलन आणि संपादन डॉ. नागेश कांबळे यांनी केले आहे. वि. स. खांडेकर, अच्युत शिरवाडकर, वा. रा. ढवळे, प्रभाकर पाध्ये, माधव गडकरी, रमेश मंत्री, डॉ. तारा भवाळकर, ग. वा. बेहेरे, ना. धों. महानोर, वसंत कानेटकर, माधव मनोहर, नारायण सुर्वे, शांता शेळके आदींनी कुसुमाग्रजांवर लिहिलेल्या लेखांचा यात समावेश आहे, अशी माहिती परचुरे प्रकाशन संस्थेचे आप्पा परचुरे यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली.
या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात कुसमाग्रजांच्या काही निवडक कविता सादर कराव्यात, अशी कल्पना पुढे आली. त्यासाठी त्याच तोडीचे साहित्यिक म्हणून मंगेश पाडगावकरांना विचारणा केली. त्यांनाही ही कल्पना आवडली आणि कुसुमाग्रजांच्या कविता सादर करण्यास त्यांनी मान्यता दिली, असे परचुरे यांनी सांगितले.
कार्यक्रमात डॉ. अनंत देशमुख कुसुमाग्रजांविषयी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.
हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता वनिता समाज सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) येथे होणार आहे.
मंगेश पाडगावकर यांच्या स्वरांत कुसुमाग्रजांच्या कविता !
कुसुमाग्रजांच्या काही निवडक कविता ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या स्वरात ऐकण्याचा दुर्मिळ योग ‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने जुळून येणार आहे.
First published on: 18-02-2014 at 02:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi bhasha divas will be celebrated as on 27 february