मुंबई : दक्षिण मुंबईतील एकेकाळी काँग्रेसचा आणि आता भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने अमराठी उमेदवार दिल्यामुळे काही मराठी भाषकांनी एकत्र येऊन निवडणुकीसाठी मराठी उमेदवार उभा केला आहे. निवडणुकीसाठी संहिता तयार करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून त्यात मराठी भाषकांना भेडसावणारे प्रश्न, बदलत्या स्थितीत होणारी गळचेपी यावर प्रकाशझोत टाकण्यात येईल. त्यामुळे आता मलबार हिल मतदारसंघामध्ये अमराठी उमेदवारांना ‘मराठी’ आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

यापूर्वीच्या बहुतांश सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेने मराठी उमेदवार दिले होते. मात्र यावेळी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (उद्धव ठाकरे) भैरू चौधरी (जैन) यांना रिंगणात उतरविले आहे. तर महायुतीतर्फे भाजपने मंत्री, आमदार मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा – ‘शासन आपल्या दारी’चा देशात गौरव

पुनर्विकासात उभ्या राहणाऱ्या बहुमजली इमारतींमधील सदनिका मराठी भाषकांना नाकारण्यात येत आहेत. आता विधानसभा मतदारसंघात अमराठी मतदारांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गिरगावमधील रवींद्र (रवी) ठाकूर यांनी मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर मलबार हिल मतदारसंघात ऑपेरा हाऊस मतदारसंघ विलीन झाला. त्यानुसार ठाकूरद्वार, गिरगाव, ऑपेरा हाऊस, खेतवाडी, ग्रॅन्ट रोड, नाना चौक, ताडदेव, वाळकेश्वर, केम्स कॉर्नर, पेडर रोड, हाजीअली आदी भाग मलबार हिल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाला. मलबार हिल मतदारसंघातील खेतवाडी, गिरगाव, ताडदेव, ग्रॅन्ट रोड आदी विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र एकेकाळी मलबार हिल विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसची घट्ट पकड होती. मलबार हिलचे काँग्रेस नेते बी. ए. देसाई प्रतिनिधित्व करीत होते. युतीच्या जागावाटपत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आणि भाजपने २००९ मध्ये हा मतदारसंघ काबीज केला.

हेही वाचा – अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी, दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

मराठी टक्का घसरला

दक्षिण मुंबईत चाळींची संख्या मोठी असून बहुसंख्य ब्रिटिशकालीन चाळी जीर्ण झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईत पुनर्विकासाचे वारे वाहू लागले आहे. चाळींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. बहुसंख्य चाळींचा पुनर्विकास सुरू आहे, तर काही इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. संयुक्त कुटुंब, पुनर्विकासात उभ्या राहणाऱ्या बहुमजली इमारतीचे न परवडणारे मासिक भाडे आदी विविध कारणांमुळे दक्षिण मुंबईमधील मराठी भाषक विरार, डोंबिवलीला स्थिरावला. त्यामुळे कालौघात अस्सल मराठमोळा परिसर असलेल्या दक्षिण मुंबईमधील मराठी टक्का कमी होत गेला. मलबार हिल विधानसभा मतदारसंघातही अशीच स्थिती आहे. या मतदारसंघातील मराठी टक्का कमी झाला असला तरी प्रत्येक निवडणुकीत मराठी मतदारांची मते निर्णयक ठरत आहेत.