केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये मराठी किंवा प्रादेशिक विषय ‘वैकल्पिक विषय’ म्हणून रद्द करण्यात आला असला तरी मराठी माध्यमातून परीक्षा देण्याची मुभा कायम राहिली आहे. सध्या राज्याच्या सेवेत मराठी वाड्मय हा विषय घेऊन यशस्वी झालेले तीन अधिकारी आहेत तर पूर्ण मराठी माध्यमातून परीक्षा दिलेले चार अधिकारी आहेत.
मिलिंद म्हैसकर (सचिव, मदत व पुनर्वसन), अश्विनी जोशी आणि श्रावण हर्डीकर या तीन अधिकाऱ्यांनी मुख्य परीक्षेच्या वेळी मराठी वाड्मय हा विषय निवडला होता. मराठी विषयाचा पर्याय रद्द झाल्याने या अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नाराजीची भावना व्यक्त केली. मराठीतून परीक्षा देण्याचा कल अलीकडे काही वर्षे वाढला आहे. नव्या नियमानुसार मराठीतून परीक्षा देण्याचा पर्याय कायम राहिला असल्याने सनदी परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढाच दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या सेवेतील भूषण गगराणी (मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ), विकास खारगे (संचालक, ग्रामीण आरोग्य प्रकल्प) आणि शीतल उगले (मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा परिषद) तसेच विश्वास नांगरे-पाटील (अतिरिक्त पोलीस आयुक्त) या चार अधिकाऱ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा मराठी भाषेतून दिली आहे. प्रादेशिक भाषांमधून मुख्य परीक्षेत उत्तरपत्रिका लिहिण्याची सवलत उपलब्ध झाल्यावर मराठी भाषेत परीक्षा देऊन सनदी सेवेत दाखल झालेले कोल्हापूरचे गगराणी हे पहिले अधिकारी आहेत.
गेल्या चार-पाच वर्षांत लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या अनेक उमेदवारांनी मराठीतून परीक्षा देण्यास सुरुवात केली आहे. अशांची संख्या आता वाढत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा