मुंबई : मराठी चित्रपटांना महत्त्वाचे शो मिळत नाहीत इथपासून ते सातत्याने प्रदर्शित होणारे हिंदूी, दाक्षिणात्य आणि हॉलीवूड चित्रपटांच्या स्पर्धेला मराठी चित्रपटांना तोंड द्यावे लागते याबद्दल सातत्याने ओरड सुरू होती. मात्र गेल्या पाच महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची संख्या आणि वेग पाहता मराठीची मराठीशीच स्पर्धा सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या महिन्याभरात तब्बल बारा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
मराठी चित्रपटांची अशीच गर्दी फेब्रुवारी महिन्यात झाली होती. जूनमध्ये पुन्हा एकदा दर आठवडय़ाला तीन ते चार मराठी चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत आहेत. जूनमध्ये प्रदर्शित होणाऱ्या हिंदूी चित्रपटांपेक्षाही ही संख्या मोठी आहे.

करोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत प्रदर्शनासाठी ताटकळलेल्या मराठी चित्रपटांची संख्या खूप मोठी आहे. एरव्ही दरवर्षी ८० ते १०० मराठी चित्रपट प्रदर्शित होत असत. जूनमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या लक्षात घेतली तर फक्त सहा महिन्यात ५० हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि तेवढेच चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. मराठीत यावर्षीच्या सुरुवातीपासून प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’, ‘पावनिखड’, ‘शेर शिवराज’, ‘धर्मवीर’ आणि आता प्रदर्शित झालेला ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटांना तिकीटबारीवर चांगली कमाई करता आली. प्रेक्षकपसंती आणि आर्थिक यश यामुळे मराठी चित्रपट निर्मात्यांचा हुरुप वाढल्याने मराठी चित्रपट प्रदर्शनाची संख्याही वाढत आहे. या आठवडय़ात हिंदूीत ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘मेजर’ आणि ‘विक्रम’ असे तीन मोठय़ा बजेटचे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही ‘झॉलिवूड’ आणि ‘इर्सल’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

या आठवडय़ात एकाच वेळी विविध विषय आणि शैलीतील ‘फनरल’, ‘अन्य’, ‘हरी ओम’ आणि ‘मजनू’ असे चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. वेगवेगळय़ा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कारांनी गौरवला गेलेला ‘येरे येरे पावसा’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा रिंकू राजगुरुची मुख्य भूमिका असलेला चित्रपट, मराठीतील नावाजलेल्या कलाकारांचा ‘भिरकिट’ आणि सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे या त्रिकुटाचा ‘मीडियम स्पायसी’ हे चार चित्रपट १७ जूनला एकच वेळी प्रदर्शित होत आहेत. तर या महिन्याच्या अखेरीस अभिनेत्री मुक्ता बर्वेची मुख्य भूमिका असलेला ‘वाय’ आणि ‘८ दोन ७५’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एकूण या महिन्याभरात बारा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकाच वेळी तीन-चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत असले तरी त्याची स्पर्धा जाणवत नसल्याची भावना निर्माते-दिग्दर्शक व्यक्त करत आहेत.

या आठवडय़ात प्रदर्शित होणाऱ्या ‘फनरल’चे दिग्दर्शक रमेश दिघे यांच्या मते, ‘येत्या जून महिन्यात अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत असून ‘फनरल’बरोबर आणखी तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पण निर्माता म्हणून कुठलीच स्पर्धा जाणवत नसून उलट फार आनंद होत आहे’, ‘सम्राट पृथ्वीराज’सारखा भलामोठा हिंदूी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तरी चित्रपटगृहांतील खेळांच्या संख्येत वितरकांनी कुठलीही तडजोड करू दिलेली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

Story img Loader