भाषा संवर्धक व भाषा अभ्यासक हे नवे पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ साहित्यिक व कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम आणि उपक्रमांतून मराठी भाषेचा जागर केला जाणार आहे. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दर वर्षी ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने राज्य शासनातर्फे मुंबईत प्रमुख सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या दिवशी राज्य वाङ्मय पुरस्कारांसह विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यासह यंदाच्या वर्षांपासून मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक आणि डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.
भाजी विक्रीचा व्यवसाय करताना वाचनाची आवड जोपासणाऱ्या आणि वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन करणाऱ्या बेबीताई गायकवाड (औरंगाबाद) यांची ‘भाषा संवर्धक’ तर परदेशातून महाराष्ट्रात येऊन, मराठी भाषा शिकून व मराठी भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. मॅक्सीन बर्नसन यांची ‘भाषा अभ्यासक’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, वसई, औरंगाबाद, जळगाव, भुसावळ, सांगली, गडचिरोली आदी ठिकाणी संबंधित विद्यापीठांमध्ये तसेच काही महाविद्यालयातही व्याख्याने, चर्चा, परिसंवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत. ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भाषातज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध जोशी, डॉ. पद्माकर पंडित, ‘ग्रंथसखा’चे श्याम जोशी, डॉ. सुधीर रसाळ, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, माधव जोशी, अरुण करमरकर, अरुण फडके आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहितीही तावडे यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा