मराठी आणि हिंदी चित्रपटांनी गेल्या काही वर्षांपासून जाहिरातीसाठी वेगवेगळे मार्ग चोखाळले असले, तरी मराठी नाटकांची मदार मात्र अजूनही वर्तमानपत्रातील जाहिराती आणि नाटय़गृहांतील पोस्टरबाजी यांवरच आहे. मात्र आता मराठी नाटकांसाठी जाहिरातबाजीचा वेगळा मार्ग खुला झाला आहे.
‘पिकल एण्टरटेन्मेण्ट’ ही संस्था आणि ‘रेडिओ मिर्चीर्’ यांच्यात नुकताच एक करार झाला असून त्या करारानुसार कोणत्याही मराठी नाटय़निर्मात्याला ‘पिकल एण्टरटेन्मेण्ट’द्वारे आता रेडिओ मिर्चीवर आपल्या नाटकाची जाहिरात करणे शक्य होणार आहे.
मराठी चित्रपट आणि नाटक यांची जाहिरात महाराष्ट्रभर ‘रेडिओ मिर्ची’वर करण्यासाठी प्रत्येक निर्मात्याला किंवा निर्मिती संस्थेला ती ‘पिकल एण्टरटेन्मेण्ट’द्वारे करावी लागणार आहे. तसा अधिकृत करार नुकताच आम्ही ‘रेडिओ मिर्ची’ या खासगी एफएम वाहिनीसह केला आहे. ‘रेडिओ मिर्ची’वर मराठी चित्रपटांच्या जाहिराती सातत्याने होत असतात. मात्र मराठी नाटकांनी हा मार्ग अजून तरी चोखाळलेला नाही. आता मराठी नाटय़निर्मात्यांनाही अशा प्रकारच्या जाहिरातींचा विचार करता येईल, असे ‘पिकल एण्टरटेन्मेण्ट’च्या समीर दीक्षित यांनी सांगितले.
सध्या ‘रेडिओ मिर्ची’ मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि कोल्हापूर या सहा शहरांत चालतो. त्यामुळे या शहरांत नाटकाचे प्रयोग असतील, त्या वेळी त्या प्रयोगांचे ठिकाण व वेळ ‘रेडिओ मिर्ची’वरून लोकांपर्यंत पोहोचू शकेल. मराठी नाटकांचे परीक्षण, आरजेकडून मराठी नाटकांच्या प्रयोगांबद्दल सातत्याने माहिती, नाटकातील कलाकारांच्या मुलाखती, नाटकातील संवादांची झलक अशा पद्धतीने नाटकाची जाहिरात रेडिओवरून करता येणार आहे. तसेच मराठी नाटकांना ‘रेडिओ मिर्ची’वरील कालावधी जाहिरातीसाठी सवलतीच्या दरात देण्याचाही आपला प्रयत्न असेल, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले.