शिकागोच्या मराठी शाळेस इलिनॉय स्टेट बोर्डाची मान्यता

भाषेचा बाज बिघडवून टाकणाऱ्या अशुद्ध शब्दांचा धुमाकूळ सुरू झाल्याने मराठीच्या भवितव्याची चिंता गडद झालेली असताना, महाराष्ट्रापासून हजारो मैल लांब असलेल्या, सातासमुद्रापारच्या अमेरिकेतील मूठभर मराठी माणसे मात्र, मराठी भाषेच्या जपणुकीसाठी तनमनधनपूर्वक धडपडत आहेत. अमेरिकेच्या मातीत जन्मलेल्या आणि तेथील भाषेशी एकरूप झालेल्या नव्या पिढीला मायबोली मराठी बोलता यावी यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांना आता फळ आले आहे. अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या झेंडय़ाखाली देशभर सुरू असलेल्या ४० मराठी शाळांमध्ये अमेरिकन मराठी कुटुंबांची पुढची पिढी श्रीगणेशा गिरवू लागली असून, शिकागो येथील मराठी शाळेला तर इलिनॉय स्टेट बोर्डाने ‘फॉरिन लँग्वेज स्कूल’ म्हणून मान्यताही दिली आहे.

दोन-तीन दशकांपूर्वी महाराष्ट्रातून अमेरिकेत गेलेल्या मराठी तरुणांचे संसार तिकडेच फुलले आणि त्यांची नवी पिढी अमेरिकेच्या मातीशी रुळू लागली. आपण जपलेले मराठीपण नव्या पिढीच्या वाढत्या वयासोबत हरवत जाणार अशी काळजी या कुटुंबांत वाढत चालली. महाराष्ट्रात, घरी असलेल्या आजी-आजोबांशी वा इतर नातेवाईकांशी तरी गरजेपुरते मराठी बोलता आले तर मुलांचे मराठीशी असलेले नाते जपले जाईल या भावनेने मुलांसाठी मराठी शाळा सुरू करण्याची कल्पना सुमारे दहा वर्षांपूर्वी मूळ धरू लागली आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचे तेव्हाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी २०१३ मध्ये मराठी शाळांची कल्पना मंडळाच्या कार्यकर्त्यांसमोर ठेवली आणि मंडळाचे विद्यमान अध्यक्ष नितीन जोशी यांनी त्यासाठी पाठपुरावा सुरू केला. श्रीमती सूर्यवंशी, श्रीमती जोशी, सुनंदा टुमणे आदी महिलांनी स्वत: शाळा चालविण्याची जबाबदारी उचलली आणि शाळेत मराठीचे बोल घुमू लागले.. आज शिकागोच्या शाळेत दोन सत्रांमध्ये वर्ग चालविले जातात आणि शंभराहून अधिक मुले मराठी शिकतात. आता अनेक मुले महाराष्ट्रातील आपल्या आजी-आजोबांशी मराठीतून गप्पा मारतात आणि फोनवरून आजीने सांगितलेली गोष्ट ऐकतच रात्री झोपी जातात..

महाराष्ट्र आणि मराठीबाबत संवेदनशील असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या छत्राखाली अमेरिकेतील मराठी माणसे द्वैवार्षिक संमेलनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांत एकत्र येतात. यंदाचे संमेलन ७ ते ९ जुलैदरम्यान मिशिगन येथे होणार असून अमेरिकेतील सुमारे चार हजार मराठीजन या संमेलनात हजेरी लावतील अशी अपेक्षा असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नितीन जोशी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक व मानसिक उभारी देण्यासाठीही बृहन्महाराष्ट्र मंडळाने काही ठोस कार्यक्रम हाती घेतला असून महाराष्ट्र फौंडेशन तसेच महाराष्ट्रातील काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून लवकरच त्याची अंमलबजावणीही सुरू होईल, असे जोशी यांनी सांगितले. मराठी भाषा, संस्कृती आणि मराठीपण टिकविण्याच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रयत्नात मराठी कुटुंबांची अमेरिकन पिढीदेखील सहभागी होईल, असा विश्वास शाळांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे बळावला असल्याचे नितीन जोशी म्हणाले.

हे कसे झाले?

२०१३ मध्ये आठवडय़ाअखेरीच्या दोन दिवसांची मराठी भाषा आणि संस्कार शाळा साकार झाली. वीकएन्डचा मोकळा वेळ सार्थकी लावण्यासाठी आधीच्या पिढीतील काहींनी मराठी शिकविण्याची तयारी दर्शविली, आणि शाळेसाठी खास अभ्यासक्रमही तयार करण्यात आला.

बघता बघता अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांमधील बृहन्महाराष्ट्र मंडळांनी मराठी शाळा सुरू केल्या. आज अमेरिकेत ४० ठिकाणी असलेल्या मराठी शाळांमध्ये ४०० हून अधिक मुले मराठीचे धडे गिरवत आहेत. अनेक स्थानिक मराठी कुटुंबांनी स्वतहून विनामोबदला शिक्षकी पेशा स्वीकारला आहे.