ऑस्करच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि न झालेल्या चित्रपटांच्या पटकथा, या पुरस्काराबाबत छापून आलेल्या बातम्या, जगभरातील वर्तमानपत्रांतील लेख, तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळातील दर्जेदार चित्रपटांचा संग्रह असा बहुमोल ऐवज असलेल्या ऑस्कर पुरस्कारांच्या संग्रहालयात आता एका मराठी चित्रपटाच्या पटकथेची निवड झाली आहे. या संग्रहालयात एखाद्या पटकथेची निवड होण्यासाठी असलेले निकष पार करत ‘होऊ दे जरासा उशीर’ या देविशा फिल्म्सच्या चित्रपटाने हा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे हा बहुमान मिळवणारा ‘होऊ दे जरासा उशीर’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, म्हणजेच ऑस्करतर्फे जॉर्जी वॉल्श यांनी रविवारीच आमच्याशी संपर्क साधून आमच्या चित्रपटाची पटकथा ऑस्करच्या संग्रहालयात समाविष्ट करून घेण्यासाठी परवानगीबाबत विचारले. या संग्रहालयात कोणत्याही चित्रपटाची पटकथा समाविष्ट करून घेण्यासाठी काही निकष आहेत, अशी माहिती आम्हाला देण्यात आली. या संग्रहालयात केवळ मूळ पटकथांची निवड होते. या पटकथांची निवड काही परीक्षक एकत्र येऊन करतात. आमच्यासाठी हा खूप मोठा सन्मान असल्याचे देविशा फिल्म्सच्या अभिजीत घोलप यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
या पटकथा ऑस्करच्या संकेतस्थळावर किंवा इंटरनेटवर उपलब्ध होत नाहीत. त्या केवळ संशोधनासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी ऑस्करच्या या संग्रहालयाला भेट द्यावी लागते. तसेच तेथेही या पटकथांची छायाप्रत काढून देत नाहीत. त्यामुळे आमची पटकथा आता किमान शंभर वर्षे अबाधित राहील, असा विश्वासही घोलप यांनी व्यक्त केला.
‘होऊ दे जरासा उशीर’ हा चित्रपट ऑस्करच्या मुख्य गटात सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासाठी लढत देणार आहे. या गटातून स्पर्धेत उतरणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तसेच या चित्रपटाच्या पटकथेची निवड आता संग्रहालयात झाल्याने आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे घोलप म्हणाले.
ऑस्करच्या नामांकनाआधीची फेरी नुकतीच पार पडली असून २५-२६ डिसेंबर रोजी ऑस्करची नामांकने जाहीर होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
मराठी चित्रपटाच्या पटकथेला ‘ऑस्कर’संग्रहालयाचे कोंदण!
ऑस्करच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि न झालेल्या चित्रपटांच्या पटकथा, या पुरस्काराबाबत छापून आलेल्या बातम्या, जगभरातील वर्तमानपत्रांतील लेख, तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळातील दर्जेदार चित्रपटांचा संग्रह असा बहुमोल ऐवज असलेल्या ऑस्कर पुरस्कारांच्या संग्रहालयात आता एका मराठी चित्रपटाच्या पटकथेची निवड झाली आहे.

First published on: 04-12-2012 at 04:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi film in oscar museum