मुंबई : आजवर मनोरंजनसृष्टीत प्रेम आणि मानवी भावभावनांचा वेध घेणाऱ्या बहुसंख्य कलाकृतींची निर्मिती झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतही प्रेमकथांवर आधारित चित्रपटांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली असून प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे प्रेमकथांवर आधारित चित्रपटांची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. या अनुषंगाने वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या रूपेरी पडद्यावर २०२५ या वर्षात मराठी प्रेमपटांची रेलचेल असून वैविध्यपूर्ण प्रेमकथांवर आधारित मराठी चित्रपट झळकणार आहेत.

सध्याच्या स्पर्धात्मक जगात तंत्रज्ञानाच्या आधारे विविध क्षेत्रांत झपाट्याने बदल होत असून कामाच्या पद्धतींनीही नवे स्वरूप धारण केले आहे. समाजमाध्यमांचे जाळे वेगाने पसरत असून त्यांनी युवा पिढीच्या मनाला व्यापून टाकले आहे. प्रेम व्यक्त करण्याची माध्यमे आणि स्वरूप बदललेले असले तरी प्रेमभावना पूर्वीसारखीच आहे. या पार्श्वभूमीवर मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गुलकंद’च्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि समीर चौघुले, प्रसाद ओक आणि ईशा डे या दोन जोड्या पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळतील. त्यांच्याबरोबर वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे कलाकारही या चित्रपटात आहेत.

‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ती सध्या काय करते’, ‘ऑटोग्राफ’ अशा सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे दिग्दर्शक सतीश राजवाडे ‘प्रेमाची गोष्ट २’च्या माध्यमातून नवीन प्रेमकथा घेऊन येत आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. सागरिका घाटगे आणि अतुल कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’चा सिक्वेल जून २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असे म्हणतात, पण जेव्हा प्रेम आणि नशीब आपल्या नियोजनानुसार ठरेल तेव्हा आयुष्यात काय घडेल? हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत आहे. तर अभिनेत्री ऋचा वैद्यासह हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री रिधिमा पंडितही चित्रपटात आहे.

घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचे आणि ‘लोकल’चे अतूट नाते आहे. कितीही गर्दी आणि समस्यांचा सामना करावा लागला, तरी मुंबईकर ‘लोकल’वर कधीच रुसत नाही. याच ‘लोकल’मध्ये घडणारी एक मनोरंजक आणि अबोल प्रेमकथा प्रेक्षकांना ‘मुंबई लोकल’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करते आहे. ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित यांनी केले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रियदर्शन जाधव लिखित – दिग्दर्शित ‘लव्ह सुलभ’ हा चित्रपटही या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला ऑयेणार आहे. या चित्रपटात प्रियदर्शन जाधवसह प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

चित्रपटाच्या माध्यमातून प्रेमकथा अनुभवताना अनेकजण संबंधित चित्रपटातील व्यतिरेखांमध्ये स्वत:ला शोधत असतात. गेली दोन वर्षे ऐतिहासिक चित्रपटांमध्ये रमलेल्या मराठीच्या रुपेरी पडद्यावर यावर्षी येणाऱ्या नवीन प्रेमपटांमध्ये नवीन कथा पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader