मुंबई : आयपीएल आणि लोकसभा निवडणुकांची धामधून देशभरात सुरू असल्याने हिंदीतील मोठे चित्रपट सध्या प्रदर्शनापासून दूर आहेत. कोणताही हिंदी, दाक्षिणात्य वा हॉलिवूडपट प्रदर्शित झालेला नसल्याने मोकळ्या असलेल्या चित्रपटगृहांमध्ये बुधवारी, १ मेला दोन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ आणि प्रसिध्द संगीतकार सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा योगेश देशपांडे दिग्दर्शित चरित्रपट ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहेत.
आयपीएल सामन्यांच्या काळात चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी असते. त्यात लोकसभा निवडणुका देशभरात टप्प्याटप्प्याने सुरू असल्याने त्याचाही परिणाम चित्रपट व्यवसायावर होतो. हे लक्षात घेऊन एप्रिल आणि मे असे दोन सुट्टीचे महिने असूनही हिंदीतील मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. हिंदीच काय इतर कोणत्याही भाषेतील मोठे चित्रपट प्रदर्शनापासून दूर असताना मराठी निर्मात्यांनी मात्र ‘महाराष्ट्र दिना’च्या निमित्ताने असलेली सुट्टी लक्षात घेत शुक्रवारऐवजी बुधवारी, १ मे रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, सारंग साठ्ये, मायरा वायकूळ अशी चांगल्या कलाकारांची फौज आहे.
घराघरातील गृहिणी आणि त्यांच्याकडे कामाला येणारी मदतनीस यांच्यातील जिवाभावाच्या नात्याची गंमत उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. तर प्रतिभावंत संगीतकार सुधीर फडके यांची गाजलेली २७ गाणी आणि त्यांचा जीवनप्रवास अशी सुरेल पर्वणी अनुभवण्याची संधी देणाऱ्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटातही सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक असे उत्तम कलाकार आहेत.
दोन्ही चित्रपटांच्या आगाऊ तिकीट विक्रीला उत्तम प्रतिसाद
दोन्ही चित्रपटांच्या आगाऊ तिकीट विक्रीला सुरूवात झाली असून ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचे पुण्यातील १० शो प्रदर्शनाआधीच हाऊसफुल्ल झाले. मुंबई – ठाण्यासह अन्य ठिकाणीही चित्रपटाची ४० ते ५० टक्के आगाऊ तिकीट विक्री झाली आहे. तर ‘नाच गं घुमा’ या चित्रपटालाही मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड येथे उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाच्या २० हजार तिकीटांची आगाऊ विक्री झाली असल्याची माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली. या आठवड्यात अन्य कोणताही हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने दोन्ही मराठी चित्रपटांना उत्तम संधी आहे.