मुंबई : मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याच्या हेतूने दरवर्षी राज्य सरकारकडून तीन मराठी चित्रपट कान आंतरराष्ट्रीय महोत्सवात पाठवले जातात. यंदा कान महोत्सवासाठी ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ हे तीन मराठी चित्रपट पाठवण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
दरवर्षी मे महिन्यात फ्रान्समध्ये कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा १७ ते २८ मे दरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रीकरण आणि पर्यटनस्थळांचे महत्त्व वाढवणे या हेतूने मराठी चित्रपट राज्य सरकारकडून कान महोत्सवासाठी पाठवले जातात. यंदा ग्रामीण भागात किशोरवयीन मुलीची होणारी परवड आणि व्यथा मांडणारा शंकर धोत्रे दिग्दर्शित ‘पोटरा’, कौटुंबिक नात्यांमधील गुंतागुंत हलक्याफुलक्या पद्धतीने उलगडणारा मंगेश जोशी दिग्दर्शित ‘कारखानीसांची वारी’ आणि रसिका आगाशे या तरुण लेखिका-दिग्दर्शिकेचा ‘तिचं शहर होणं’ या तीन चित्रपटांची निवड कान महोत्सवासाठी करण्यात आली.