६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी घवघवीत यश संपादन केले असून, चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान मिळाला. ‘किल्ला’ या चित्रपटाला सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटाचा, तर ‘एलिझाबेथ एकादशी’ला सवरेत्कृष्ट बालचित्रपटाचा मान मिळाला. न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक होत आहे. हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. याशिवाय रवी जाधव दिग्दर्शित ‘मित्रा’ला सवरेत्कृष्ट लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय भाऊराव क ऱ्हाडे दिग्दर्शित ‘ख्वाडा’ या चित्रपटाला विशेष परीक्षक पुरस्कार आणि सवरेत्कृष्ट ऑडिओग्राफी असे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत.  
मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये हिंदीत अपेक्षेप्रमाणे विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘हैदर’चे वर्चस्व राहिले आहे. सवरेत्कृष्ट चित्रपटाचा किंवा दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘हैदर’ला मिळाला नसला, तरी विविध विभागांतील एकूण पाच राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत. ‘क्वीन’साठी भलेही कंगना राणावतला फिल्मी वर्तुळातील पुरस्कारांसाठी डावलण्यात आले असले, तरी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने तिच्यावर सवरेत्कृष्ट अभिनेत्री म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. कंगनाचा हा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. विकास बहल दिग्दर्शित ‘क्वीन’ चित्रपटाला सवरेत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा रजतकमळ पुरस्कार जाहीर झाला आहे. ओमंग कु मार दिग्दर्शित ‘मेरी कोम’ या चित्रपटालाही सवरेत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा एकमेव पुरस्कार मिळाला आहे.
सवरेत्कृष्ट अभिनेता म्हणून या वर्षी ‘हैदर’ चित्रपटासाठी अभिनेता शाहीद कपूरला नामांकन मिळाले होते. मात्र या स्पर्धेत कन्नड अभिनेता विजय याने बाजी मारली आहे. त्याला ‘नन्नू अवनल्ला अवलू’ या चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे, तर सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार बंगाली चित्रपट दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांना मिळाला आहे. सवरेत्कृष्ट संवाद आणि सवरेत्कृष्ट संगीतकार असे दोन राष्ट्रीय पुरस्कार ‘हैदर’ चित्रपटासाठी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना जाहीर झाले आहेत, तर याच चित्रपटातील ‘बिस्मिल’ या गाण्यासाठी सवरेत्कृष्ट पाश्र्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार सुखविंदर सिंग यांना आणि सवरेत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कार सुदेश अधाना यांना जाहीर झाला आहे. ‘हैदर’साठीच सवरेत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार डॉली अहलुवालिया यांना मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये केवळ ‘हैदर’, ‘क्वीन’ आणि ‘मेरी कोम’ या तीनच हिंदी चित्रपटांना पुरस्कार मिळवता आले आहेत. बालकलाकार पार्थ भालेराव याला मराठी ‘किल्ला’ आणि हिंदीत ‘भूतनाथ रिटर्न्‍स’ चित्रपटातील भूमिकांसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे.

हा निश्चितच मोठा सन्मान

जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले असले तरी राष्ट्रीय पारितोषिकांमध्ये दिग्दर्शकाला पदार्पणातील चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळणे याचे अप्रूप आहे. एक मात्र खरे की, देशात ज्या ज्या ठिकाणी आम्ही ‘कोर्ट’चा खेळ दाखविला त्या त्या ठिकाणी प्रेक्षकांकडून ही कलाकृती म्हणजे समाजाचे प्रतिबिंब लख्ख आरशात उमटल्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया मिळाली होती.
    – दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे (कोर्ट)
 
मनापासून केलेल्या कामाला दाद
सवरेत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पारितोषिक मिळाले यामुळे झालेला आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही आहे. ‘कोर्ट’ चित्रपटात बचाव पक्षाचा वकील विनय व्होरा ही भूमिका करण्याबरोबरच निर्माता म्हणून जबाबदारी स्वीकारली. हे यश आमच्या संपूर्ण टीमचे यश आहे.
विवेक गोंबर, निर्माता व कलावंत – कोर्ट
 
वेगळ्या वाटेवरचे चित्रपट करण्यासाठी बळ
‘हैदर’ हा खऱ्या अर्थाने माझ्यासाठी यशस्वी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला मिळालेल्या पाच राष्ट्रीय पुरस्कारांमुळे आता माझ्या मनातील भीती निघून गेली आहे. वेगळ्या वाटेवरचेच चित्रपट करायला हवेत, हा विश्वास बळावला आहे.  मला मनापासून कोणता चित्रपट करायचा आहे यावरच माझा भर असला पाहिजे, हे माझ्या लक्षात आले आहे.
    – विशाल भारद्वाज

पहिल्याच चित्रपटाच्या बहुमानाचा आनंद
दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे याचा खूप आनंद झाला आहे.  २६ जूनला ‘किल्ला’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्या वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा ही इच्छा आहे. मात्र पुरस्कारांमुळे गोष्टी नक्कीच बदलतात.
    – अविनाश अरुण, दिग्दर्शक – किल्ला

चित्रपटाच्या वेगळ्या प्रयोगाला दाद
‘मित्रा’ला सवरेत्कृष्ट लघपुटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही खूप आनंदाची भावना आहे. सतत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याला मिळालेली ही दाद आहे असे वाटते. प्रत्येक चित्रपटात एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न मी आजवर केला आहे. तुमच्या अशा कलाकृतीला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कारांसारखी मोठी दाद मिळते तेव्हा नवे काही करण्याची तुमची उमेद आणखी वाढते.
    – रवी जाधव, दिग्दर्शक – मित्रा

राष्ट्रीय पुरस्कार हे एखादे स्वप्न
‘मेरी कोम’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, अशी कल्पनाही केली नव्हती. पण, हा पुरस्कार मिळाल्यानंतर माझे स्वप्न वास्तवात उतरल्यासारखे वाटते आहे. दिग्दर्शक म्हणून पहिल्याच चित्रपटाला एवढा मोठा बहुमान मिळावा यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही.
    – दिग्दर्शक ओमंग कुमार, मेरी कोम

राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद वेगळाच  
‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट करताना त्याला पुरस्कार मिळेल का?, लोकांना तो आवडेल का?, असे कोणतेही आडाखे आम्ही बांधले नव्हते. दिग्दर्शक परेशच्या शब्दांत सांगायचे तर त्याला हा चित्रपट डोळ्यासमोर दिसला. समीक्षकांनीही तो उचलून धरला आणि आता राष्ट्रीय स्तरावर तो पोहोचला आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळणे म्हणजे देशभरातील लोकांनी या चित्रपटाला पसंतीची पोचपावती मिळाली आहे. याचा आनंद वेगळाच.
मधुगंधा कुलकर्णी, निर्माती – एलिझाबेथ एकादशी

कोर्ट’ एकाचवेळी देशभरात
२० देशांची भ्रमंती, २० चित्रपटमहोत्सवांमधून लावलेली हजेरी आणि त्यापैकी १७ महोत्सवातील पुरस्कारांवर कोरलेले नाव असा प्रवास करणारा ‘कोर्ट’ हा चित्रपट एकाचवेळी राज्यासह देशभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट प्रदर्शित होत असतानाच यास राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. ‘कोर्ट’ हा चित्रपट देशात आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये फिरून आला असल्याने तो फक्त मराठी चित्रपट राहिलेला नाही.आणि म्हणूनच देशभरातील प्रेक्षकांपर्यंत एकाचवेळी हा चित्रपट पोहोचवण्यात येणार आहे.

Story img Loader