नामांकित मराठी व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिकांच्या मार्गावरील नामफलक गायब
एकेकाळी अस्सल मराठमोळा भाग असलेल्या गिरगाव, ठाकूरद्वार, चिराबाजार, ऑपेरा हाऊस परिसरांत नामांकित मराठी व्यक्ती व स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाने असलेल्या मार्गावरील व गल्ल्यांवरील नामफलकच अचानक गायब झाल्याने दक्षिण मुंबईची मराठी ओळखच पुसून निघणार की काय अशी भीती येथील रहिवाशांना सतावू लागली आहे. याबाबत काही ज्येष्ठ नागरिकांनी पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच उत्तर न मिळाल्याने आणि रातोरात नामफलक गायब झाल्याने रस्त्याचे नाव बदलणार की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
संगीत क्षेत्रात मानाचे स्थान असलेले प्रख्यात गायक आणि पालिका शाळेतील संगीत शिक्षक आर. एन. पराडकर यांचे गिरगावमधील ठाकूरद्वार नाक्यावरील चौकाला नाव देण्यात आले होते. गिरगावमधील पूर्वी बोरभाट लेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गल्लीचे क्रांतिवीर राजगुरू मार्ग असे नामकरण करण्यात आले होते. तर ऑपेरा हाऊसजवळील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या बाजूलाच असलेल्या अवंतिकाबाई गोखले रोडवरील चौकास सुप्रसिद्ध इतिहास, संशोधक, साहित्यिक व ज्ञानतपस्वी प्रा. न. र. फाटक यांचे नाव देण्यात आले होते. या तिन्ही रस्त्यांचे काही वर्षांपूर्वी नामकरण करण्यात आले होते. मात्र गेल्या आठ ते दहा महिन्यांपूर्वी या मार्गावरील नामफलक एका रात्रीच गायब झाले. हे नामफलक कुणी काढले की त्याची चोरी झाली हे गुलदस्त्यातच आहे.
रस्त्यांना मराठी व्यक्तींची नावे दिलेले नामफलक अचानक गायब झाल्याचे निदर्शनास येताच समाजसेवक सुरेंद्र तेलंग यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांकडून विचारणा केली. परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
गिरगाव परिसरात भुरटे चोर आणि गर्दुल्ल्यांचा वावर वाढू लागला आहे. कदाचित त्यांनीच हे नामफलक चोरले असावेत, अशी शंका काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र मराठी व्यक्तींची नावे असलेल्या रस्त्यांवरील लोखंडी खांबासकट नामफलक गायब झाले आहेत. या परिसरातील मराठी टक्का प्रचंड प्रमाणात घसरला आहे. आता नामफलक गायब होऊ लागल्याने या भागातील मराठी ओळखही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या रस्त्यांची नावे बदलण्याचा घाट कुणी घालत तर नाही ना, अशी शंका काही रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी व्यक्तींची नावे असलेल्या रस्त्यांवरील नामफलक गायब झाल्याची तक्रार आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत या रस्त्यांची नावे बदलू देणार नाही.
– सुरेंद्र बागलकर, स्थानिक नगरसेवक,शिवसेना

सध्या रस्ते, चौक, तिठय़ांना अमराठी माणसांची नावे देण्याचे पेव फुटले आहे. एखाद्या ठिकाणी नावाची पाटी दिसत नसली तर पूर्वी तेथे नावच दिलेले नाही असे समजून नव्या व्यक्तीचे नाव दिले जाते. अशा पद्धतीने नावे बदलण्याचे सत्र मुंबईत सुरू आहे. भाजपचे प्राबल्य वाढत असून रस्त्यांना अमराठी नावे देण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. पालिका प्रशासनाचा हा गलथानपणा आहे. मराठी नावे हटविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. मनसे कदापि हे खपवून घेणार नाही.
– दिलीप नाईक, मनसे

मुंबईमधील सर्व विभाग कार्यालयांतील रस्त्यांचे नामफलक बदलण्यात येणार आहे. अलीकडेच ‘ए’ विभाग कार्यालयातील नामफलक बदलण्यात आले असून टप्प्याटप्प्याने सर्वच विभागांतील रस्त्यांवरील नामफलक बदलण्यात येणार आहेत. काही नामफलक खराब झाल्यामुळे ते काढण्यात आले असावेत.
– देवीदास क्षीरसागर, साहाय्यक आयुक्त, पालिका डी विभाग कार्यालय.