मराठी भाषा दिनी नृत्य-संगीत कार्यक्रमावर दहा लाखांचा खर्च
मुंबई विद्यापीठ यंदा राज्य सरकारच्या तंत्र व शिक्षण विभागाने केलेल्या सूचनेबरहुकूमानुसार २७ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित्त कधी नव्हे ते उदार होत तब्बल १० लाखाहून अधिक रक्कम खर्च करणार आहे. अर्थात या बातमीमुळे मराठी भाषेच्या अभ्यासकांनी किंवा साहित्याच्या अभ्यासकांनी हुरळून जाण्याची काहीच गरज नाही. कारण, ही इतकी मोठी रक्कम मराठी भाषेचे संवर्धन व्हावे म्हणून हाती घेतल्या जाणाऱ्या एखाद्या प्रकल्पावर किंवा चर्चा, परिसंवादांकरिता कारणी लागणार नसून ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक गंगा’ या तीन तासांच्या नृत्य आणि संगीत यांचा कलाविष्कार असलेल्या अशोक हांडे प्रस्तुत रंगारंगी सांस्कृतिक कार्यक्रमावर खर्च होणार आहे.
कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसांचे औचित्य साधत राज्यभर, नव्हे तर देशभरातील मराठी भाषाप्रेमी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषादिन म्हणून उत्साहाने साजरा करतात. या दिवशी राज्य सरकारबरोबरच विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, सांस्कृतिक संस्थाही विविध कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतात. एरवी विद्यापीठे त्यांच्या त्यांच्या स्तरावर हा दिवस कसा साजरा करावा याचा निर्णय घेतात. परंतु, यंदा हा दिवस विद्यापीठांनी कसा साजरा करावा हे ठरविण्याचा मक्ता राज्य सरकारनेच उचलला. त्याकरिता सरकारच्या तंत्र व उच्च शिक्षण विभागाने राज्यातील विविध विद्यापीठांच्या उच्चपदस्थांची बैठक बोलावत एका भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाची ‘उच्च’प्रतीची कल्पना त्यांच्यासमोर मांडली. इतकेच नव्हे तर या कार्यक्रमावर पाच ते दहा लाख रुपये खर्च करून आपली झोळीही मुक्त हस्ते रिती करण्याचे फर्मानही सरकारने विद्यापीठांकरिता काढले. त्या सूचनांबरहुकूम मुंबई विद्यापीठाने तब्बल १० लाख रुपये खर्च करत या रंगारंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे.
रत्नागिरीतील सावरकर सभागृहात होणाऱ्या या तीन तासांच्या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतील मान्यवर, सरकारी अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांना या कार्यक्रमाकरिता निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, विद्यापीठ स्तरावर शैक्षणिक किंवा वैचारिक स्वरूपाचे कार्यक्रम होणे अभिप्रेत नाही का, असा प्रश्न केल्यावर ‘मराठी भाषा दिनानिमित्त केले जाणारे कार्यक्रम हे विद्यापीठापुरतेच मर्यादित राहतात. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी राज्य सरकारने केलेल्या सूचनेनुसारच आम्ही हा कार्यक्रम करीत आहोत,’असा खुलासा विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. खान यांनी केला.
सरकारचा अट्टहास..
इतक्या मोठय़ा संख्येने सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या राहण्याखाण्याची सोय करताना विद्यापीठाचे अधिकारी मात्र हैराण झाले आहेत. मराठी सांस्कृतिक प्रदर्शनाच्या नावाखाली इतक्या पैशाची होणारी नासाडी विद्यापीठातील काही उच्चपदस्थांनाही मंजूर नाही. तरीही सरकार आणि विद्यापीठातील अन्य काही अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे हा कार्यक्रम विद्यापीठाला करावा लागतो आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून सरकारने आणि विद्यापीठाने बौद्धिक दिवाळखोरीच दाखवून दिली आहे, अशी टीका एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केली.
..पेपर फुटतात तेव्हा सरकार कुठे असते?
विद्यापीठे, महाविद्यालये काणाडोळा करतात म्हणून सरकारने पुढाकार घेतला असे सांगण्यात येते. मग हेच सरकार जेव्हा पेपर फुटतात, निकाल उशिरा लागतात तेव्हा हस्तक्षेप करून विद्यापीठाची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याकरिता पुढाकार का घेत नाही, असा थेट सवाल एका मराठीच्या प्राध्यापकांने केला.