मुंबई : मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो मिळत नाहीत, मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत, अशी ओरड गेली काही वर्षे सातत्याने सुरू आहे. मुळात शिक्षणापासून मनोरंजनापर्यंत आपल्याकडे मराठी भाषेला कुठेच प्राधान्य दिले जात नाही. परिणामस्वरूप प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम वा तिसरे स्थान मिळते, अशी खंत दिग्दर्शक, अभिनेते हृषिकेश जोशी यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हृषिकेशजोशी लिखित, दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ कार्यालयाला हृषिकेश जोशी आणि चित्रपटातील कलाकार अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता आलोक राजवाडे यांनी भेट दिली.

हेही वाचा >>> “त्यानंतर शाळेत सगळेजण मला चिडवायला लागले”; गिरिजा ओकने सांगितला पहिल्या जाहिरातीनंतरचा अनुभव, म्हणाली…

या गप्पांदरम्यान त्यांनी मराठी भाषेबद्दल एकंदरीतच उदासीनता दिसून येत असल्याने त्याचा फटका मराठी चित्रपटांनाही बसत असल्याचे स्पष्ट केले. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनात येणाऱ्या अडचणींबद्दल बोलत असताना प्रेक्षक मराठीऐवजी अन्य चित्रपटांना प्राधान्य देतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. दाक्षिणात्य चित्रपट किती चांगले चालतात, याचे दाखले नेहमी दिले जातात, मात्र तेथील प्रेक्षक दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांना प्रथम प्राधान्य देतात. मुंबईत कित्येकदा दाक्षिणात्य चित्रपटांचे सकाळचे शोही  हाऊसफुल्ल झाल्याचे कित्येकदा अनुभवाला आले आहे. मातृभाषेबद्दल असा अभिमान वाटला तर सगळे प्रश्न सुटतील, असे मत हृषीकेश जोशी यांनी या वेळी व्यक्त केले.

मी दोन रुपयांनी स्वस्त आहे म्हणून..

घरातली रद्दी घेतानाही इंग्रजी वर्तमानपत्रे-पुस्तके यांचा दर जास्त व मराठीचा दर कमी असा भेदभाव केला जातो. दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील मात्र सगळय़ा रद्दीला एकच भाव दे. रद्दीतही तू मला काय सांगतोस.. मी दोन रुपयांनी स्वस्त आहे म्हणून.. असे रद्दीवाल्याला सुनावल्याचा किस्सा जोशी यांनी सांगितला. चित्रपटगृह व्यावसायिकाला मराठी चित्रपटांसाठी कमी भाडे मिळते, गुजराती वा इंग्रजी चित्रपटासाठी अधिक भाडे मिळते. या स्थितीत कोणीही अधिक भाडे देणाऱ्यांनाच प्राधान्य देणार. मग इथे मराठीचे नुकसान कोणी केले? असा सवालही त्यांनी केला. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला अभिनेत्री प्राजक्ता माळी, हृषिकेश जोशी आणि आलोक राजवाडे यांनी भेट दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language not get priority anywhere says teen adkun sitaram movie director actor hrishikesh joshi zws