ज्येष्ठ गीतकार गुलजार यांचे प्रतिपादन ; अरुण शेवते यांच्या ‘शर्वरीच्या कविता’संग्रहाचे प्रकाशन
साहित्यकृतीमधून व्यक्त होणाऱ्या वैयक्तिक दु:खाचा धागा जेव्हा समाजातील दु:खाशी जुळला जातो, तेव्हाच ती साहित्यकृती प्रभावी ठरत असते. साहित्य परस्परांशी वाटून घेण्याची आवश्यकता असून मराठीमध्ये इतर भाषांमधील साहित्य अनुवादित होत असल्याचे गोडवे गाण्यापेक्षा मराठी साहित्य इतर भाषांमध्ये पोहचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी गुलजार यांनी केले. प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे सभागृहात आयोजित कवी अरुण शेवते लिखित ‘शर्वरीच्या कविता’ या संग्रहाच्या प्रकाशन संमारंभात ते बोलत होते. यावेळी शेवते यांनी आपली मुलगी शर्वरी हिच्याविषयी लिहिलेल्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन गुलजार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, यशवंतराव गडाख, अभिनेत्री अमृता सुभाष, पिंपरी येथील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील, सचिन इटकर, शर्वरी शेवते आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक पुरुषाच्या आत एक स्त्री वसत असून त्यांच्यात मातृत्वाची भावना नेहमीच असते. शेवते यांच्या या कवितांमधून हीच मातृत्वाची भावना दिसून येते. तसेच जवाहरलाल नेहरू व इंदिरा यांच्यातील बाप-मुलीचे नाते हे आपल्यासाठी आदर्शवत असल्याचेही गुलजार पुढे म्हणाले. यावेळी पी.डी पाटील यांचा साहित्य संमेलन यशस्वी पार पडल्याबद्दल सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सार्वजनिक जीवनाच्या धकाधकीमुळे आपल्याला मुलींना वेळ देता आला नसल्याची खंत व्यक्त करत सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, वडिलांच्या स्वत:च्या मुलीविषयी असलेल्या भावना व्यक्त करणाऱ्या या कवितांचा अनुवाद होऊन त्या देशभर गेल्या पाहिजेत. तसेच साहित्य संमेलनातून लोकशिक्षण होणे गरजेचे असून पिंपरी येथील साहित्य संमेलनाने पैशाचा वापर साहित्य सेवेसाठी विधायकपणे कसा करता येतो हे आपल्याला दाखवून दिल्याचेही मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा