१९६०च्या दशकानंतर राज्यातील अनेक उपेक्षित घटकांतील साहित्यिक पुढे आले, त्यांनी नवे अनुभव यांची ओळख मराठी साहित्यविश्वाला करून दिली. काही मोजक्याच साहित्यिकांच्या पुस्तकांचे इंग्रजी व इतर भाषांमध्ये अनुवाद झाले. ते अजूनही जागतिक स्तरावर म्हणावे त्या प्रमाणात गेले नसल्याची खंत ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केली.
शंकर पाटील, गंगाधर पानतावणे, नामदेव ढसाळ, उद्धव शेळके आदी दलित, ग्रामीण साहित्यिकांपैकी बहुतांश साहित्यिक कार्यकर्ते, आंदोलनकर्तेही असल्याने त्यांच्या लिखाणाला वेगळी ओळख निर्माण झाली, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मल्याळम पत्रिका ‘काका’ व पॅशन फोर कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील एनसीपीए येथे ‘गेटवे लिटफेस्ट’ या दोन दिवसीय परिषदेत ‘मराठी साहित्यातील १९६० व ९० च्या दशकातील विविध साहित्य प्रवाह आणि संघर्ष’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. सचिन केतकर यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्रात कवी हेमंत दिवटे, पत्रकार-अनुवादक जेरी पिंटो, मुस्तानसीर दळवी आदी सहभागी होते.
मल्याळम भाषेतील साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये गेले असून इतर भाषांमधील साहित्यही मल्याळममध्ये भाषांतरित होण्याचे प्रमाण अधिक असल्याने साहित्याच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्या तुलनेत मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचली नाही. इंग्रजी व इतर भाषांमधील साहित्य मराठीत येण्याची गरज आहेच, मराठी साहित्यही इंग्रजीत गेले पाहिजे. परंतु अनुवाद करण्याची परंपरा कमी पडत असल्याने मराठी साहित्य जागतिक स्तरावर जाऊ शकले नाही त्यासाठी सर्वानी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत केतकर यांनी व्यक्त केले. मल्याळम व मराठी भाषांतील आदानप्रदान करणारी चळवळ उभी राहावी, प्रत्येक साहित्य संमेलनात भाषांतील साहित्यावर चर्चा व्हावी अशा भावनाही या वेळी त्यांनी व्यक्त केल्या.
मराठी साहित्याच्या अनुवादाचे प्रमाण कमी; साहित्यिकांची खंत
काही मोजक्याच साहित्यिकांच्या पुस्तकांचे इंग्रजी व इतर भाषांमध्ये अनुवाद झाले.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 24-02-2016 at 02:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi literature translation percentage low