अनुवादाला वाहिलेले पहिलेच नियतकालिक; पुढील महिन्यापासून वाचकांसाठी अंक उपलब्ध

मराठीत वाङ्मयीन नियतकालिकांची मोठी परंपरा आहे. असे असले तरी मराठी साहित्य इतर भाषांमध्ये पोहोचावे यासाठी आजवर नियतकालिकांच्या स्तरावर विशेष प्रयत्न झाल्याचे मात्र आढळत नाही. परंतु वाशिम येथील काव्याग्रह प्रकाशनातर्फे  मराठी साहित्याच्या हिंदी व इंग्रजी अनुवादाला वाहिलेले ‘काव्याग्रह’ हे नियतकालिक साहित्यप्रेमींच्या भेटीला येणार असून लवकरच त्याचे अंक वाचकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

मराठीत वाङ्मयीन नियतकालिकांचे साहित्यनिर्मिती व साहित्यप्रसारात महत्त्वाचे योगदान आहे. परंतु आजवर या नियतकालिकांचा सारा साहित्यव्यवहार फक्त मराठी भाषेतूनच होत आला आहे. साहित्य अकादमीच्या हिंदी व इंग्रजी नियतकालिकांतून किंवा त्या त्या भाषांतील अनुवादित साहित्याला वाहिलेल्या नियतकालिकांतून मराठी साहित्य काही प्रमाणात अनुवादित होत असते. संपूर्णपणे मराठी साहित्याच्या अनुवादाला वाहिलेले नियतकालिक मात्र उपलब्ध नाही. ही बाब ध्यानात घेऊन काव्याग्रह प्रकाशनाच्या विष्णू जोशी यांनी पुढाकार घेऊन मराठी साहित्याच्या हिंदी व इंग्रजी अनुवादाची नियतकालिके प्रकाशित करण्याचे ठरवले आहे.

विदर्भातील वाशिम येथून २०१०पासून ‘काव्याग्रह’ हे वाङ्मयीन नियतकालिक मराठीतून प्रकाशित होत आहे. त्यात मराठीतील अनेक लेखक-कवींचे साहित्य प्रसिद्ध झाले आहे. आता हे नियतकालिक मराठीसह हिंदूी व इंग्रजीतही त्रमासिक स्वरूपात प्रकाशित होणार आहे. त्यात मराठीतील साहित्य हिंदूी व इंग्रजीत अनुवादित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हिंदी व इंग्रजीतील पहिले अंक मे महिन्यात वाचकांसाठी उपलब्ध होणार आहेत. हिंदीतील पहिल्याच अंकात कवी चंद्रकांत पाटील यांच्यावरील हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक विष्णू खरे यांचा लेख, लोकनाथ यशवंत यांच्या कवितासंग्रहाला बाबुराव बागूल यांनी लिहिलेली प्रस्तावना, तसेच दासू वैद्य, प्रफुल्ल शिलेदार, अजय कांडर यांच्या कविता आदी साहित्याचा समावेश असणार आहे. तर इंग्रजीतील अंकात गणेश विसपुते, प्रज्ञा दया पवार, ऐश्वर्य पाटेकर, रवी कोरडे, फिलीप डिसुझा यांच्या कविता, प्रणव सखदेव यांच्या कथेचा अनुवाद, तसेच आशुतोष जावडेकर व योगिनी सातारकर पांडे यांचे लेख असणार आहेत.

मराठीतील दर्जेदार साहित्य हिंदूी व इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचत नाही, याची खंत वाटत होती. मराठी साहित्य या भाषांमध्ये पोहोचल्यास त्याची व्याप्ती वाढेल, आपल्या साहित्याचा परिचय त्या भाषांमधील वाचकांना होईल, असे वाटते. आपल्याकडे अनुवादक उपलब्ध आहेत. त्यांच्याद्वारे उत्तमोत्तम मराठी साहित्य हिंदी व इंग्रजीत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. हा मराठीतील पहिलाच प्रयत्न आहे.   – विष्णू जोशी, संपादक, काव्याग्रह