शंभर वर्षांतून एकदाच येणारा योग म्हणून गेल्या वर्षी ११.११.११ चा मुहूर्त साधून ‘स्वराज्य.. मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु, त्या दिवशी चित्रपट प्रदर्शनाचा शुक्रवारच होता. यंदा १२.१२.१२ मुहूर्त असला तरी शुक्रवार नाही. तरीही हा योग साधण्यासाठी ‘श्यामचे वडील’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्याशिवाय नव्या मराठी चित्रपटांचे मुहूर्त, नावांची घोषणा, एक नाटक आणि एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले जाणार आहे.
आर. विराज यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘श्यामचे वडील’ या चित्रपटात तुषार दळवी, चिन्मय उदगीरकर, डॉ. मोहन आगाशे, विनय आपटे, सुरेखा तळवलकर आदी कलावंत असून अंधेरी येथील सिनेमॅक्स चित्रपटगृहात दोन विशेष खेळ आयोजित करण्यात आले आहेत. संध्याकाळी ५ वाजता आणि नंतर रात्री ८ वाजता हे खेळ होतील. जादुई मुहूर्त साधायचा म्हणून विशेष खेळ होत असले तरी चित्रपट संबंध राज्यभर शुक्रवारीच प्रदर्शित केला जाणार आहे.
यंदाचा जादुई मुहूर्त साधण्यासाठी दोन मराठी चित्रपटांचे मुहूर्त केले जाणार आहेत. रईस लष्करिया प्रॉडक्शनतर्फे दोन मराठी चित्रपटांची घोषणा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी रात्री ८ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला शर्मिला राज ठाकरे आणि अस्लम लष्करिया उपस्थित राहणार आहेत. चित्रपटांची नावे त्या वेळीच जाहीर केली जाणार असून एका चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर तर दुसऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन अवधूत गुप्ते करणार आहेत.
त्याशिवाय डी स्टार मूव्हीज या बॅनरअंतर्गत दीपिका के यांची निर्मिती असलेल्या ‘प्रॉडक्शन नंबर वन’ या चित्रपटाचा मुहूर्त केला जाणार आहे. पटकथेची पूजा करून मुहूर्त केला जाणार असून दिग्दर्शन संदीप करणार आहेत. अतुल जगदाळे यांचे छायालेखन असलेल्या या चित्रपटाची कथा-पटकथा दीपिका के व रूपेश देशपांडे यांनी लिहिली आहे. अंधेरी येथे हा मुहूर्ताचा कार्यक्रम होणार आहे.
चार मराठी चित्रपटांचे मुहूर्त आणि प्रदर्शन यानिमित्ताने केले जाणार असले तरी मराठी नाटय़सृष्टीनी मात्र या जादुई मुहूर्ताची फारशी दखल घेतलेली नाही. ‘इथं नाव ठेवायलाच जागा नाही’ हे मराठी नाटक रंगभूमीवर येणार आहे. सकाळी ११ वाजता शिवाजी मंदिरला या नाटकाचा पहिला प्रयोग होत असून ‘मि आणि दिनराज’ या बॅनरची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन विलास पडळकर यांनी केले आहे. बॉलिवूडने मात्र या जादुई मुहूर्त साधण्याचा प्रयत्न फारसा केलेला नाही. फक्त सनी देओलचा ‘सिंग साब द ग्रेट’  या चित्रपटाचे चित्रीकरण यानिमित्त सुरू केले जाणार आहे. अनिल शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून भोपाळमध्ये मुहूर्ताचे चित्रीकरण केले जाणार आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा