लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : राजावाडी रुग्णालयात नव्याने सुरू केलेल्या सीटी स्कॅन व एमआरआय केंद्रांवर इंग्रजीतून लावलेला नामफलकाविरोधात शिवसेनेने (ठाकरे) आंदोलन केल्यानंतर काढण्यात आला असून त्याजागी मराठी भाषेतील फलक लावण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील सेठ वी. सी. गांधी आणि एम. ए. वोरा राजावाडी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्णांना सीटी स्कॅन आणि एमआरआय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाने सीटी स्कॅन आणि एमआरआय केंद्र उभारले. हे केंद्र उभारण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने मॅक्सिस हेल्थ केअर इमॅजिन या खासगी संस्थेला दिले आहे. केंद्राचे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी इंग्रजी भाषेत मोठा नामफलक लावला होता. याची माहिती घाटकोपरमधील शिवसेनेतील (ठाकरे) शिवसैनिकांना कळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली केंद्रावरील नामफलक मराठीत लावण्यात यावा, अशी मागणी मॅक्सिस हेल्थ केअर इमॅजिन संस्थेचे व्यवस्थापक शैलेश त्रिवेणी यांच्याकडे केली.
या प्रकाराबद्दल शैलेश त्रिवेणी यांनी दिलगिरी व्यक्त करत तातडीने नामफकल बदलण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार तात्काळ इंग्रजीमधील नामफलक काढण्यात आला. तसेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कंत्राटदाराने सीटीस्कॅन व एमआरआय केंद्रांवर मराठी भाषेतील नामफलक लावले, अशी माहिती शिवसेनेच्या (ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी यांनी दिली.