भाषिक वैविध्याच्या प्रदर्शनात राज्यभाषेला किरकोळ स्थान
नमिता धुरी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजधानीतील नामांकित संस्थांची राज्यभाषेला डावलण्याची सवय काही केल्या मोडत नसून ‘नेहरू विज्ञान केंद्रा’तील भाषिक वैविध्याच्या प्रदर्शनात मराठीला किरकोळ स्थान मिळाले आहे. याउलट, हिंदूी, संस्कृत, इंग्रजी, तेलुगू, उर्दू, बंगाली या भाषांचे लेखन नमुने ठसठशीतपणे उपलब्ध आहेत.
‘भारतातील भाषिक वैविध्य’ हे प्रदर्शन पुढील ६ महिने विज्ञान केंद्रात असणार आहे. विणकाम, भरतकाम, इत्यादींद्वारे भाषा कापडावरही लिहिली जाते. या माध्यमातून ती लिखित स्वरूपात घराघरांत पोहोचत असल्याचे उदाहरण म्हणून प्रदर्शनात कापडावर लिहिलेल्या मजकुराचे हिंदूी, संस्कृत, उर्दू, तेलुगू भाषांतील नमुने लावण्यात आले आहेत. मात्र कापडावरील मराठी लेखनाचा नमुना येथे नाही. देशातील नामांकित मंडळींनी परस्परांना लिहिलेली इंग्रजी आणि बंगाली भाषेतील पत्रे नमुनादाखल प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील नामवंतांनी लिहिलेले एकही मराठी पत्र येथे नाही.
भारतात ट्रक हे केवळ मालवाहतुकीचे नाही तर भाषेच्या प्रसाराचेही माध्यम ठरते, असा संदेश देण्यासाठी ट्रकच्या पाश्र्वभागाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यावर ‘माँ का आशीर्वाद’, ‘मेरा भारत महान’, इत्यादी हिंदूी, इंग्रजी वाक्ये आहेत. वाहनांच्या मागे लिहिल्या जाणाऱ्या ‘आईचा आशीर्वाद’, ‘मुलगी शिकली प्रगती झाली’, इत्यादी मराठी वाक्यांचा मात्र विसर पडला आहे. संस्कृतचा इतर भाषांवरील प्रभाव, संस्कृत व्याकरणावरील पाणिनीचा ग्रंथ, गुरुकुल शिक्षणपद्धत अशी सविस्तर माहिती संस्कृतबाबत मांडण्यात आली आहे. मराठीबाबत इतकी सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतरही केवळ हिंदीत माहिती
‘मातृभाषा हे शिक्षणासाठीचे महत्त्वाचे माध्यम असून तिच्या साहाय्याने मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. भारतीय शिक्षण व्यवस्थेत भारतीय भाषांचे स्थान आक्रसले जात असून प्रत्येक भारतीयाने आपल्या भाषांचे संरक्षण करणे व त्यांना बळकट करणे आवश्यक आहे’, असा संदेश प्रदर्शनात देण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला ‘नेहरू विज्ञान केंद्र’ हेही एकप्रकारे शैक्षणिक केंद्र असूनही येथे स्थानिकांच्या मातृभाषेला फारसे महत्त्व मिळत नाही. संपूर्ण प्रदर्शनाची माहिती केवळ इंग्रजीत लिहिलेली आहे. ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतरही केवळ हिंदूीत माहिती मिळते. याबाबत केंद्राकडे विचारणा केली असता ‘आवश्यक असेल तेथे आमचे कर्मचारी प्रेक्षकांना मराठीत माहिती सांगतील’, असे उत्तर देण्यात आले. प्रदर्शनात मराठी वृत्तपत्राचे पहिले पान, ‘श्यामची आई’ सिनेमाची जाहिरात, २२ भाषांमधील गाणे यांपुरतेच मराठीचे अस्तित्त्व मर्यादित आहे.
…
सध्या सुरू असलेले प्रदर्शन हे फिरते प्रदर्शन असून ते विविध राज्यांमध्ये जाणार आहे. त्यामुळे तेथील माहिती कोणत्याही प्रादेशिक भाषेत देण्यात आलेली नाही. येथे येणाऱ्या मराठी भाषिक प्रेक्षकांना सोप्या, सरळ भाषेत माहिती देण्यासाठी विज्ञान केंद्राने तशी तयारी केली आहे.
– एस. एम. बानी, ग्रंथालय अधिकारी, नेहरू विज्ञान केंद्र.