मराठी कवितेला जागतिक परिमाण मिळवून देणारे ज्येष्ठ कवी अरुण कोलटकर यांची कविता प्रसिद्ध करताना प्रकाशकाची कोणतीही परवानगी न घेतल्याने, तसेच कवितेखाली प्रकाशकाचा उल्लेख न केल्याने, हा स्वामित्वहक्क (कॉपीराइट) कायद्याचा भंग आहे, हा मराठी साहित्य व्यवहारातील गैर प्रकारांवर क्ष-किरण टाकणारे ज्येष्ठ समीक्षक, प्रास प्रकाशनाचेअशोक शहाणे यांचा दावा मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने ‘सकाळ’ या वर्तमानपत्राला माफीनामा प्रसिद्ध करण्याचे तसेच खटल्याचा खर्चही शहाणे यांना देण्याचे आदेश दिले आहेत.
गुर्मीला चपराक..
विशेष म्हणजे ज्या लेखात ही कविता उद्धृत होती त्या लेखाच्या जागेच्या प्रमाणातच हा माफीनामा प्रसिद्ध करावा लागणार आहे. स्वामित्वहक्क भंगप्रकरणी मराठी वर्तमानपत्राला अशा प्रकारचा आदेश प्रथमच मिळाला असावा. परिणामी या कायद्याच्या दृष्टीने हा निकाल दूरगामी परिणाम करणारा ठरणारा आहे.
‘सकाळ’ च्या ‘सप्तरंग’ या रविवार पुरवणीत २०११ साली कवी संदीप खरे यांचा ‘माझे नसून माझे’ हे सदर सुरू होते. ३ जुलै२०११ ला याच सदरात त्यांनी ‘अरुण कोलटकरच्या चार कविता’ या पुस्तकातील ‘परंपरा’ ही संपूर्ण कविता उद्धृत केली होती. त्या खाली काव्यसंग्रहाचे नाव होते, मात्र प्रकाशकाचे नाव नमूद केले नव्हते. हे करताना संदीप खरे वा संबंधित वर्तमानपत्राने प्रकाशक अशोक शहाणे यांची रीतसर कोणतीही परवानगी घेतली नव्हती. ही बाब लक्षात येताच अशोक शहाणे यांनी ‘सकाळ’चे पुणे कार्यालय गाठले व तेथील वरिष्ठांच्या लक्षात ही बाब आणून दिली. ‘ही बाब वरिष्ठांच्या कानावार घालून तुमच्याशी संपर्क करू,’ असे उत्तर त्यांना मिळाले. मात्र, पुढे त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
दुसऱ्या दिवशी शहाणे यांनी वर्तमानपत्राच्या पुणे कार्यालयात माफिनाम्याची मागणी करणारे पत्र पाठविले, त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी ‘सकाळ’च्या मुंबई कार्यालयाशी संपर्क साधून संपादक उत्तम कांबळे यांच्यापर्यंत ही बाब पोहोचवली. त्यांच्याकडूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर तीनदा कायदेशीर नोटीस पाठवूनही काही उपयोग होईना तेव्हा सरतेशेवटी शहाणे यांनी न्यायालयातच खटला दाखल केला. ३ ऑक्टोबर २०१३ रोजी न्या. शहारूख काथावाला यांनी पहिल्याच सुनावणीत संबंधितांना हा स्वामित्वहक्क कायद्याचा भंग असल्याचे खडे बोल सुनावले आणि माफिनाम्याचा आदेश दिला.
या निकालाबाबत अशोक शहाणे म्हणाले की, वर्तमानपत्रांनी स्वामित्वहक्काविषयी सजग राहिले पाहिजे. इतकेच नव्हे तर वर्तमानपत्राशी संबधित अभ्यासक्रमात या कायद्याची माहिती देणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे आपण काहीही करू शकतो, आणि त्याबाबत कोणीही जाब विचारू शकत नाही,असा समज करून घेतलेल्या लोकांना या निकालामुळे चांगलीच चपराक बसली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा