गेल्या सहा महिन्यांपासून ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर आजारी होते. तब्येतीच्या असंख्य तक्रारींमुळे त्यांच्या डॉक्टर मुलांनी घरातच त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग उभारला होता. अखेर बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास पाडगावकरांची प्राणज्योत मालवली. दत्त निवासातल्या घरी त्यांची लिखाणाची एक स्वतंत्र खोली होती. या खोलीतच आपल्याला मरण यावे अशी त्यांची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. बाबांनी लिखाणाच्या खोलीतच अखेरचा श्वास घेतला, असे सांगताना त्यांचा धाकटा मुलागा डॉ. अजित पाडगावकर यांना अश्रू आवरणे कठीण झाले.
बुधवारी दुपारी पाडगावकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आपल्या कवितेतून जगण्यावर आणि जन्मावर शतदा प्रेम करण्याचा संदेश देणाऱ्या पाडगावकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक कवी, साहित्यिक, कलाकार, प्रकाशक, राजकारणी आदींनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि जीवनयात्री कवीचे अखेरचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडगावकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली व कुटुंबियांचे सांत्वन केले. स्वातंत्र्यानंतर मराठीत उदयाला आलेल्या नवकवींच्या मांदियाळीत मंगेश पाडगावकर हे एक अग्रेसर नाव. कोवळ्या वयातल्या त्यांच्या कवितांवर कविवर्य बा. भ. बोरकर यांचा स्पष्ट प्रभाव दिसतो, असं जाणकारांचे म्हणणे आहे.
साठ-सत्तरच्या दशकांत पाडगावकरांची भावगीते आणि यशवंत देव-श्रीनिवास खळे यांचे संगीत हे समीकरण अतिशय लोकप्रिय झाले. टेलिव्हिजनची झगमग सुरू होण्यापूर्वी आकाशवाणी हे मध्यमवर्गीय मराठी माणसाचे आनंदनिधान होते.
आकाशवाणीमुळे पाडगावकरांची दर्दमधुर, सौम्य सुरावटीची गाणी घरोघरी पोहोचली आणि मराठी भावजीवनाचा भाग झाली. प्रेमाचे निरनिराळे विभ्रम आपल्या गर्भश्रीमंती शैलीत शब्दबद्ध करणारे, प्रेमळ भाववृत्तीचे पाडगावकर अखेरच्या काळात मात्र कबीर, मीरा आणि बायबलकडे वळले तेव्हा आयुष्याचे वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांकडे बोलून दाखवली होती.
‘जिप्सी’नंतर पाडगावकरांची कविता कुसुमाग्रज-बोरकरांचे संस्कार पचवून स्वत:ची वेगळी वाट चोखाळते. लोभस प्रतिमासृष्टी, मोहक शब्दकळा, प्रेमाची तरल, भावार्त अनुभूती आणि गेयता या गुणांमुळे पाडगावकरांची कविता वाचकांच्या मनाला भुरळ घालत आली आहे. ‘एकीकडे अवीट गोडीची भावगीते लिहिणारे पाडगावकर ‘सांग सांग भोलानाथ’ असे मिठ्ठास बालगीतसुद्धा लिहून जात, याचे कौतुक करावे तितके थोडे.
– डॉ. मीना वैशंपायन, ज्येष्ठ अभ्यासक
बाबांच्या आठवणी
बाबांचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझ्या लग्नात त्यांनी एक खास गाणे लिहिले आणि मला भेट म्हणून दिले. पुढे ते गाणे अतिशय गाजले. ‘दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे’ हे ते गाणे.’ अशी हृद्य आठवण त्यांच्या कन्या अंजली कुलकर्णी यांनी सांगितली.
ल्ल बाबा नाहीत ही कल्पना सहन होत नाही. आता माझ्या मागून मला कधीही हाक देतील, असं मला वाटतं. माझ्या जगातला ‘जिनियस’च नाही. हे दु:ख पचवणे कठीण जातंय. केवळ बाबा म्हणून नाही तर कौटुंबिक आणि कवीचं आयुष्य या दोन्ही गोष्टी ते उत्तम सांभाळत आले. त्यांचा आवाज सतत कानात घुमत असल्याने ते जवळच आहेत असे जाणवते, अशी प्रतिक्रिया पाडगावकरांचे ज्येष्ठ पुत्र अभय यांनी व्यक्त केली.
ल्ल गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती खालावली असतानाही बाबांनी अखेरच्या दिवसांत २२ कविता लिहिल्या. यातील काही कविता काही दिवसांपूर्वीच त्यांनी मला वाचायला दिल्या होत्या. भविष्यात या कविता छापल्या गेल्यास त्या कवितासंग्रहाला ‘पुनर्जन्म’ हे नाव द्यावे, अशी त्यांची इच्छा होती. यातील एक कविता यंदाच्या ‘मौज’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कविता लिहीत राहणारे ते ‘कवियोगी’च होते अशा शब्दांत त्यांचे पुत्र डॉ. अजित पाडगावकर यांनी भावना व्यक्त केली.
हॅशटॅग, कॉलरटय़ून..
पाडगावकर अखेपर्यंत साहित्यिक-सांस्कृतिक वर्तुळात सक्रिय होते. गेल्या महिन्यातच ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्या समवेत त्यांनी स्वत:च्या गाण्यांवर आधारित कार्यक्रमात भाग घेतला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या नातवाला एक गीत लिहून दिले होते. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे अगदी सेम असते’ अशा खुसखुशीत ओळी लिहिणाऱ्या पाडगावकरांचे युवावर्गाशी खास पटत असे, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. यामुळेच त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समाजमाध्यमांवरून त्यांच्या कविता आणि संदेश फिरू लागले. ट्विटवर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘हॅशटॅग’ही तयार करण्यात आला होता. तर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांची गाणी आपली ‘कॉलर टय़ून’ म्हणून ठेवली होती.